ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - वाढत्या असहिष्णूतेच्या मुद्यावरून देशात सध्या बराच वाद सुरू असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत सांप्रदायिक हिंसेत कमी लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या अहवालातून समोर आली आहे. यावर्षी सांप्रदायिक हिंसेच्या घटनांमध्ये आत्तापर्यंत ८६ लोकांचा मृत्यू झाला असून गेल्या वर्षी (२०१४) हे प्रमाण ९० इतके होते.
सांप्रदायिक हिंसेच्या घटनांबद्दल बोलायचे झाले तर गेल्या वर्षीच्या तुलनेत हिंसेच्या घटनांमध्ये बरीच वाढ झाली आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत सांप्रदायिक हिंसेच्या ६३० घटना घडल्या आहेत तर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हे प्रमाण ५६१ इतके होते. तर २०१३ साली युपीए सरकारच्या कार्यकाळात तब्बल ६९४ घटना घडल्या होत्या, त्यामध्ये मुझफ्फरनगरच्या दंगलीचाही समावेश होता, ज्यात ६५ नागरिक मारले गेले होते.
यावर्षी सांप्रदायिक हिंसेच्या घटनेत तब्बल १८९९ नागरिक जखमी झाले, गेल्या वर्षी जखमींची संख्या १,६८८ इतकी होती.
गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार, २०१३ साली महाराष्ट्रातील धुळे व उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये घडलेल्या दोन घटनांमध्ये ७० लोक मृत्यूमुखी पडले तर सुमार १०० नागरिक जखमी झाले होते. २०१४ साली एनडीएची सत्ता आल्यानंतर जुलै महिन्यात युपीतील सहारणपूरमध्ये झालेल्या घटनेत ३ जण मृत्यूमुखी पडले तर २३ लोक जखमी झाले. मात्र २०१५ मध्ये आत्तापर्यंत अशी कोणतीही मोठी घटना घडली नसल्याचे तरी अहवालात नमूद करण्यात आले आहे.