नवी दिल्ली:जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांची केंद्र सरकारवरील टीका सुरुच आहे. त्यांनी यापूर्वी अनेक मुद्द्यांवर केंद्रावर निशाणा साधला आहे. आता परत एकदा त्यांनी बीएसएफच्या अधिकारक्षेत्रावरुन केंद्रावर टीका केली आहे. 'त्यांना वाटते की, बहुमत असल्यामुळे ते काहीही करू शकतात. पंजाबमध्ये त्यांनी 50 किमीचा परिसर बीएसएफला का दिला? पोलिसांच्या कार्यक्षमतेवर त्यांना विश्वास नाही का? नागालँडप्रमाणे पंबाजमध्येही हत्या होणार', अशी जहरी टीका त्यांनी केली आहे.
फारुख अब्दुल्ला पुढे म्हणात, 'आम्हाला पाकिस्तानी म्हटले जायचे, मला खलिस्तानीही म्हटले जायचे. पण आम्ही कधीही भारताविरोधात घोषणाबाजी किंवा कट कारस्थान केले नाही. आम्ही महात्मा गांधींच्या मार्गावर चालतो आणि गांधींचा भारत परत आणू इच्छितो. कलम 370 रद्द केल्यापासून राज्यात अडचणी वाढल्या आहेत',असंही ते म्हणाले. शेर-ए-काश्मीर भवन येथे आयोजित एक दिवसीय परिषदेत फारुख अब्दुल्ला बोलत होते.
'...तर वेळ निघून जाईल'
फारुख अब्दुल्ला पुढे म्हणाले, 'जम्मू-काश्मीरला आम्ही नेहमीच कठीण काळातून बाहेर काढले आहे. आता पुन्हा आपल्याला ते मार्ग शोधावे लागतील ज्याद्वारे आपण आपले हक्क परत मिळवू शकतो. केंद्राला आमचे म्हणणे समजेल तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. आम्हाला नेहमी पाकिस्तानी म्हटले जाते. पण, आमच्या पक्षाच्या एकाही कार्यकर्त्याने कधीच देशाविरोधात घोषणाबाजी केली नाही. कधी ग्रेनेड फेकला नाही, कधी दगड उचलला नाही,'असंही ते म्हणाले.