नवी दिल्ली : जेटचे संस्थापक नरेश गोयल यांना प्राप्तिकर विभागाने कथित कर चोरीच्या प्रकरणात समन्स जारी केले आहेत. या विभागाने गतवर्षी एअरलाइन्सच्या मुंबईस्थित कार्यालयात झडती घेतली होती आणि दस्तऐवज सील केले होते.जेट एअरवेज आणि त्यांच्या दुबईस्थित ग्रुप कंपन्या यांच्यात प्राप्तिकर विभागाच्या तपास शाखेला कथितरित्या अनियमितता आढळून आली होती. सूत्रांनी सांगितले की, ६५० कोटी रुपयांची कर चोरी करणे हा त्यांचा हेतू होता. तपासात असेही आढळून आले होते की, एअरलाइन्स दरवर्षी दुबईमध्ये आपल्या जनरल सेल्स एजंटला कमिशन देते. ते ग्रुप यूनिटचाच एक भाग आहेत.प्राप्तिकर कायद्यानुसार वैध ट्रान्झॅक्शनच्या तुलनेत ही घेवाणदेवाण खूपच जास्त आहे. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेट एअरवेजने आपला जून तिमाहीचा अहवाल जाहीर करण्यास उशीर केला तेव्हाच हा सर्व्हे करण्यात आला होता. या संशयित घेवाणदेवाणीचे स्पष्टीकरण देण्याबाबत गोयल यांना विचारणा करण्यात आली आहे. जेटने याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे. तथापि, काही दिवसांपूर्वी जेटने स्पष्ट केले होते की, हे ट्रान्झॅक्शन कायद्यानुसारच आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनिस्ट्री आॅफ कॉर्पोरेट अफेअर्सनेही काही घेवाणदेवाण संशयित असल्याचे म्हटले होते. जेटच्या अकाउंटसची पाहणी केल्यानंतर एक विस्तृत तपास करण्याची शिफारस केली होती.
जेटचे गोयल यांना प्राप्तिकरचे समन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 3:12 AM