नवी दिल्ली: तुम्ही अनेकदा आयकर विभागाच्या धाडीबद्दल किंवा नोटीस पाठवल्याबद्दल ऐकलं असेल. पण, आयकर विभागाच्या या धाडी मोठ्या किंवा पैशावाल्या लोकांवरच पडत असतात. पण, उत्तर प्रदेशातून एक चकीत करणारे प्रकरण समोर आले आहे. आयकर विभागाने एका रिक्षा चालकाला तीन कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे. ऐकून थोडे विचित्र वाटत असल तरी ते खरं आहे. ही तीन कोटी रुपयांची नोटीस मिळाल्यानंतर रिक्षाचालक घाबरला असून, त्याने पोलिसांकडे मदत मागितली आहे.
3 कोटी रुपये द्यावे लागणार
मिळालेल्या माहितीनुसार, मथुरेच्या बकलपूर भागातील अमर कॉलनीत राहणाऱ्या प्रताप सिंह यांना आयकर विभागाकडून तीन कोटी रुपये भरण्याची नोटीस मिळाली. ही नोटीस मिळाल्यानंतर हायवे पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. प्रताप सिंह रिक्षा साधा रिक्षा चालक आहे, पण त्याला तब्बल तीन कोटी रुपयांची नोटीस मिळाली आहे. पोलिसांनी अद्याप या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केला नाही. परंतु या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
पॅन कार्डमुळे फसवणूक
प्रताप सिंह यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड करुन संपूर्ण प्रकरण सांगितले आहे. प्रताप यांनी सांगितल्यानुसार, 15 मार्च रोजी त्यांनी बकलपूर येथील जन सुविधा केंद्रात पॅन कार्डसाठी अर्ज केला होता. बँकेने त्यांना आपले पॅन कार्ड सादर करण्यास सांगितले होते. प्रताप यांना जन सुविधा केंद्राने 1 महिन्याच्या आत कार्ड येईल, असे सांगितले. पण, कार्ड आलेच नाही आणि नंतर त्यांना कळलं की त्यांचे पॅन कार्ड संजय सिंह नावाच्या व्यक्तीला देण्यात आलं आहे. दरम्यान, प्रताप पॅन कार्डसाठी अनेक वेळा केंद्रात गेले आणि त्यांना पॅन कार्डची रंगीत प्रिंट देण्यात आली. रिक्षाचालक सुशिक्षित नव्हता, ज्यामुळे त्याला पॅन कार्ड मूळ आहे की फोटोकॉपी हे माहित नव्हतं. पण, जेव्हा प्रतापला आयटी विभागाकडून फोन आला तेव्हा सगळा प्रकार समजला.
एका वर्षात 43.44 कोटींची उलाढाल
आयटी विभागाने प्रताप यांना 3,47,54,896 रुपये देण्यास सांगितले आहे. पण, प्रताप रिक्षा चालक असल्यामुळे इतके पैसे त्यांच्याकडे नव्हते. अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुणीतरी त्यांच्या पॅन कार्डचा उपयोग करुन एकाच वर्षात (2018-2019) सुमारे 43.44 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. अधिकाऱ्यांनी प्रताप यांना या प्रकरणात एफआयआर नोंदवण्याचा सल्ला दिला आहे.