बेंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी जवळपास 300 आयकर विभागाचे अधिकारी कर्नाटकात धाड टाकण्याच्या तयारीला लागले असल्याचा आरोप केला होता. आज आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी राज्यात 24 ठिकाणी धाडी टाकल्या आहेत.
केंद्रात सत्तेमध्ये असलेला भाजपा सरकारी संस्थांचा गैरवापर करत असून निवडणुकीच्या तोंडावर मुद्दामहून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचा मोठी फौज कर्नाटकात पाठविण्यात येणार आहे. उद्यापासून ते राज्यात धाडी टाकतील. त्यांची अवस्था पश्चिम बंगालसारखी करण्याचा इशारा बुधवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी दिला होता.
कुमारस्वामी म्हणाले की, आयकर विभागाचे 300 हून अधिक अधिकारी बेंगळुरुच्या वाटेवर आहेत. कदाचीत उद्या ते धाडी टाकतील. केंद्र सरकार बदल्याचे राजकारण करत आहे. आम्हाला माहिती आहे हे केवळ निवडणुकीसाठी सुरु आहे. जर असेच सुरु राहिले तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी जे केले ते आम्ही करू.
पश्चिम बंगालमध्ये शारदा चिटफंड घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या कोलकाता पोलिस आयक्तांच्या घरावर छापा टाकण्यासाठी सीबीआयचे अधिकारी गेले होते. मात्र, ममता बॅनर्जी यांनी आधीच सीबीआयच्या धाडींसंबंधीचा करार मोडीत काढला होता. यामुळे या अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हे राजकीय नाट्य दोन दिवस चालले होते. ममता बॅनर्जींसह पोलिस आयुक्तही उपोषणाला बसले होते. या घटनेमुळे देशभरात मोठा वाद निर्माण झाला होता.
आयकर विभागाने आज 24 ठिकाणी धाडी टाकल्या. यामध्ये 13 कंत्राटदार, 4 अभियंत्यांच्या घरी, कार्यालयांमध्ये छापे मारण्यात आले. यामध्ये एकूण 1.66 कोटींची रक्कम जप्त करण्यात आली असून शोधमोहिम सुरु आहे.