अभिलाष खांडेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
भोपाळ : देशातील मोठ्या माध्यम समूहांपैकी एक असलेल्या दैनिक भास्कर माध्यम समूहाच्या (डीबी कॉर्प लिमिटेड) विविध कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने छापे मारले. नवी दिल्लीसह मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरात येथील विविध कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी छापे टाकून झाडाझडती घेतली.
प्राप्तिकर खात्याने भोपाळ, जयपूर, ग्वाल्हेर, मुंबई आणि अहमदाबादसह ३० हून अधिक ठिकाणी छापे मारले आहेत. भोपाळमध्ये अरेरा काॅलनीमध्ये भास्कर समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर अग्रवाल यांच्यासह संचालक गिरीश अग्रवाल यांचे मुंबई आणि पवन अग्रवाल यांच्या दिल्लीतील निवासस्थानीदेखील छापे मारण्यात आले. महाराष्ट्रातून आलेल्या वाहनांमधून प्राप्तिकर विभागाचे अनेक अधिकारी व कर्मचारी अरेरा कॉलनीतील अग्रवाल हाऊसमध्ये पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास दाखल झाले. याशिवाय शेकडो कर्मचाऱ्यांनी विविध शहरांमध्ये भल्या पहाटे कारवाई सुरू केली.
निनावी लॉकर सापडले
या छाप्यांमध्ये निनावी लॉकर सापडल्याचेही सांगितले जात आहे. हे छापे दोन दिवस सुरू राहतील, अशी शक्यता आहे. सूत्रांनी सांगितले की, मनी लाँड्रिंगची शक्यता आहे. आगामी काळात मोठ्या घोटाळ्याचा खुलासा होऊ शकतो, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आयटी विभागाने केले ट्वीट
मीडियाच्या काही वर्गातून असे आरोप समोर आले की, आयटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशिष्ट प्रकाशनाच्या कार्यालयांवरील या कार्यवाहीत अशा सूचना केल्या की, लेखांमध्ये बदल करावा. मात्र, आयटी विभागाने ट्वीट करत हे आरोप फेटाळून लावले आहेत. या विभागाने असेही स्पष्ट केले आहे की, आम्ही शिष्टाचाराचे पालन करत कार्यवाही केली आहे. तपास पथकाने केवळ या समूहाच्या कर चुकवण्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांवर लक्ष केंद्रित केले.