मागच्या काही दिवसांपासून आम आदमी पक्ष आणि या पक्षाचे नेते विविध केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आलेले आहेत. पक्षाचे मुख्य संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, संजय सिंह आणि सत्येंद्र जैन हे तुरुंगात आहेत. त्यातच आता आपचे आमदार गुलाब सिंह यादव यांच्या मालमत्तांवर प्राप्तिकर विभागाने धाड टाकली आहे. मटियाला मतदारसंघातील आमदार असलेल्या गुलाब सिंह यादव यांच्या ७ मालमत्तांवर प्राप्तिकर विभागाकडून ह्या धाडी टाकण्यात आल्या होत्या. स्वत: गुलाब सिंह यांनी या कारवाईची माहिती दिली. पहाटे ५ वाजता प्राप्तिकर विभागाचे अधिकारी त्यांच्या घरी छापे मारण्यासाठी पोहोचले, असे त्यांनी सांगितले.
काल दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी मार्लेना यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ईडीच्या ताब्यात असतानाही अरविंद केजरीवाल यांनी एक आदेश पारित केला आहे. आतिशी यांनी केजरीवाल यांच्या हवाल्याने सांगितले की, मला समजलंय की, दिल्लीच्या काही भागात पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या समस्या निर्माण झाल्याचं समजलंय. याबाबत मी चिंतीत आहे. मी तुरुंगात आहे. मात्र त्यामुळे लोकांना कुठल्या समस्यांचा सामना करावा लागता कामा नये.
केजरीवाल यांनी आपल्या आदेशात सांगितले की, उन्हाळा येतोय. जिथे पाण्याची टंचाई आहे, तिथे योग्य प्रमाणात टँकरांची व्यवस्था करावी. जनतेला कुठल्याही समस्यांचा सामना करावा लागू नये यासाठी मुख्य सचिवांसह इतर अधिकाऱ्यांना योग्य आदेश द्यावेत. जनतेच्या समस्यांवर त्वरित तोडगा निघाला पाहिजे. गरज भासल्यास नायब राज्यपालांचंही सहकार्य घ्या, ते अवश्य मदत करतील, अशी माहिती आतिशी यांनी दिली.