नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागानं बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांचे भाऊ आणि पार्टीचे उपाध्यक्ष आनंद कुमार आणि त्यांच्या पत्नीविरोधात मोठी कारवाई केली आहे. प्राप्तिकर विभागानं कुमार यांची बेनामी जमीन जप्त केली आहे. या जमिनीची किंमत तब्बल ४०० कोटी रुपये इतकी आहे. दिल्लीला लागून असलेल्या नोएडा भागात ही जमीन आहे. मायावतींचा भाऊ आनंद कुमार यांच्या संपत्तीचा तपास प्राप्तिकर विभागाकडून केला जात होता. नोएडामध्ये आनंद कुमार यांची बेनामी जमीन असल्याचं तपासातून समोर आलं. सात एकरवर पसरलेल्या या जमिनीचं मूल्य ४०० कोटींच्या घरात आहे. आनंद कुमार आणि त्यांची पत्नी विचित्र लता यांच्या मालकीची बेनामी जमीन जप्त करण्याचे आदेश १६ जुलैला दिल्लीतील बेनामी संपत्ती विरोधी विभागानं दिले होते. यानंतर आज प्राप्तिकर विभागानं जप्तीची कारवाई केली. आनंद कुमार यांच्या आणखी बेनामी संपत्तींची माहिती आपल्याकडे असल्याचा दावा प्राप्तिकर विभागातील सूत्रांनी केला. येत्या काळात आनंद कुमार यांच्या आणखी संपत्तींवर टाच आणली जाऊ शकते, असे संकेतदेखील सूत्रांनी दिले. आनंद कुमार यांच्यावरील कारवाईची झळ मायावतींपर्यंत पोहोचू शकते. या प्रकरणी प्राप्तिकर विभागासोबतच सक्तवसुली संचलनालयाकडूनदेखील चौकशी सुरू आहे. प्राप्तिकर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मायावतींचे भाऊ आनंद कुमार यांच्या १,३०० कोटी रुपयांच्या संपत्तीची चौकशी सुरू आहे. २००७ ते २०१४ या कालावधीत आनंद कुमार यांची संपत्ती तब्बल १८ हजार पटीनं वाढल्याचा प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्यांचा दावा आहे. २००७ मध्ये आनंद कुमार यांच्याकडे ७.१ कोटींची संपत्ती होती. २०१४ मध्ये ती थेट १,३०० कोटींवर जाऊन पोहोचली. आनंद कुमार संचालक असलेल्या १२ कंपन्या प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत.