चेन्नई- प्राप्तिकर विभागाच्या अधिका-यांनी शहरातल्या वेगवेगळ्या भागात टाकलेल्या छाप्यात कोट्यवधींची अघोषित संपत्ती जप्त केली आहे. तपासात हे अघोषित संपत्तीधारक शशिकलाचे नातेवाईक असल्याचं उघड झालं आहे. प्राप्तिकर विभागाला छाप्यात 1430 कोटींची अघोषित संपत्ती आढळली आहे. या लोकांनी ही संपत्ती कशा प्रकारे कमावली, याचा प्राप्तिकर विभागाच्या अधिका-यांना थांगपत्ता लावला आहे.या 10 करदात्यांची चौकशी केली असता, ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे हे सर्व जण अण्णाद्रमुकच्या नेत्या व्ही. के. शशिकला यांच्या कुटुंब व मित्र परिवारातील आहेत. प्राप्तिकर विभागाच्या अधिका-यांनी गुरुवारी शहरातल्या विविध भागातल्या 187 परिसरात एकाच वेळी छापेमारी केली आहे. करचोरीच्या प्रकरणात शशिकलांचा भाचा टीटीव्ही दीनाकरण यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. चेन्नईतल्या जया टीव्हीवरही ही छापेमारी करण्यात आली आहे. सात कोटींहून अधिकची रोकड व पाच कोटी किमतीचे दागिने जप्त करण्यात आल्याचीही माहिती चेन्नईच्या एका वरिष्ठ प्राप्तिकर विभागाच्या अधिका-यानं दिली आहे. प्राप्तिकर विभागाच्या अधिका-यानं सांगितलं की, संशयित कागदपत्र व 1430 कोटींच्या अघोषित संपत्तीचा थांगपत्ता चौकशीअंती लावण्यात आला आहे. यातील सर्वाधिक संपत्ती ही तामिळनाडूमध्ये आहे.
शशिकलाच्या नातेवाईकांच्या घरी प्राप्तिकर विभागाचे छापे, 1430 कोटींची अघोषित संपत्ती जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 11:21 AM