मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये आयकर विभागाची एक अनोखी नोटीस समोर आली आहे. ही टॅक्स नोटीस सध्या चर्चेचा विषय बनली आहे. दहा वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या महिलेच्या नावावर विभागाने कोट्यवधींची नोटीस बजावली आहे. या महिलेच्या घरी जेव्हा आयकर विभागाची साडेसात कोटींची नोटीस पोहोचली तेव्हा कुटुंबीयांना मोठा धक्काच बसला.
मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने याआधी मेलवरही नोटीस पाठवली होती, मात्र त्यावर कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांच्या पत्त्यावर नोटीस पाठवण्यात आली. नोटीस मिळताच कुटुंबीयांनी आयकर विभागात जाऊन चर्चा केली. हा कर 2017-18 या वर्षासाठी असल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर नातेवाईकांनी पोलिसांनाही याबाबत माहिती दिली.
2013 मध्ये महिलेचं झालं निधन
ज्या महिलेला आयकर विभागाने नोटीस बजावली आहे तिचे नाव उषा सोनी आहे. ती सरकारी शाळेत शिक्षिका होती. तिच्या पतीचे नाव तिलोक सोनी असून ते बैतूलच्या बडोरा भागात राहतात. उषा सोनी यांचे 20 नोव्हेंबर 2013 रोजी आजारपणामुळे निधन झाले. या नावावर आयकर विभागाने 26 जुलै रोजी 7 कोटी 55 लाख 69 हजार 30 रुपयांची कर नोटीस जारी केली आहे.
मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये आयकर विभागाची एक अनोखी नोटीस समोर आली आहे. 2017-18 मध्ये नॅचरल कास्टिंग नावाच्या कंपनीने भंगार दुसऱ्या कंपनीला विकल्याचे विभागाने जारी केलेल्या कागदपत्रावरून कळले आहे. या डीलमध्ये उषा सोनी यांचे पॅनकार्ड वापरले गेले, ज्यांचा आधीच मृत्यू झाला आहे.
"आई सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून काम करायची"
नोटिशीबाबत उषा सोनी यांचा मुलगा पवन सोनी सांगतो की, आई सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून काम करायची. त्याच्या पॅनकार्डचा गैरवापर झाला आहे. त्यामुळे साडेसात कोटींचा कर भरण्याची नोटीस आली आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत बैतूल पोलिसांचे एसपी सिद्धार्थ चौधरी सांगतात की, तक्रारीच्या आधारे पोलीस आता आयकर विभागाकडून माहिती गोळा करतील, त्यानंतर तपास पुढे केला जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.