ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 21 - प्राप्तिकर विभागानं करदात्यांना धमकी अथवा कारणे दाखवा नोटीस पाठवू नये, असे आदेश केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डा(सीबीडीटी)नं प्राप्तिकर विभागाला दिला आहे. नोटाबंदी केल्यानंतर ऑपरेशन क्लीन मनीच्या माध्यमातून काळा पैसा बाहेर काढण्यासाठी त्यावेळी चौकशी केल्याचंही सीबीडीटीनं सांगितलं आहे, असं वृत्त लाइव्ह मिंटनं दिलं आहे. प्राप्तिकर विभागानं आता करदात्यांना विनाकारण नोटीस पाठवून त्रास देऊ नये, असं आठ पानी पत्रच सीबीडीनं प्राप्तिकर विभागाला दिलं आहे. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीनं जास्त पैसे जमवल्याचा संशय आल्यास त्यांच्याशी ऑनलाइनच्या माध्यमातून संपर्क साधा आणि नम्रतेने बोला. त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस बजावू नका, असंही सीबीडीटीनं पत्रात म्हटलं आहे. नोटाबंदीच्या 50 दिवसांनंतर प्राप्तिकर विभागानं बँक खात्यात 5 लाखांच्या वर रक्कम जमा करणा-या 11 लाख लोकांना एसएमएस आणि इमेलच्या माध्यमातून नोटीस बजावली होती. त्यातील 6 लाख लोकांनी रिटर्न फाइल करत असल्याचं उत्तर दिलं आहे. 15 फेब्रुवारीपूर्वी बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आलेल्या संशयित रकमेवरून प्राप्तिकर विभागानं ही कारवाई केली होती. मात्र आता केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड(सीबीडीटी)नं प्राप्तिकर विभागाला अशा प्रकारे कोणालाही त्रास न देण्याचं आवाहन केलं आहे.
प्राप्तिकर विभागानं करदात्यांना धमकी देऊ नये- सीबीडीटी
By admin | Published: February 21, 2017 9:37 PM