नवी दिल्ली : वार्षिक चार लाखांचे उत्पन्न असणारे शिवाय बऱ्यापैकी मिळकत असूनही कर न भरणारे नागरिक आता आयकर विभागाच्या रडारवर येणार आहेत. या आर्थिक वर्षांत अशा एक कोटी नव्या लोकांना आयकर दाता बनविण्याची एक महत्त्वाकांक्षी मोहीम आयकर विभागाने सुरू केली आहे.केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या (सीबीडीटी) अध्यक्ष अनिता कपूर यांनी रविवारी एका वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. किमान करयोग्य उत्पन्न मिळविणाऱ्या लोकांनी रिटर्न भरणे सुरू करावे, अशी आमची इच्छा आहे. किमान करयोग्य उत्पन्न मिळवणारे लोक मोठ्या प्रमाणात आहे. या करदात्यांनी लहान लहान रकमेतील कर भरल्यास एक चांगली गोष्ट घडू शकते. वार्षिक चार लाख उत्पन्न असलेले लोक रिटर्न दाखल करीत नसल्याचे आम्हाला आढळले आहेत. आतापर्यंत अशा लोकांना आम्ही वेगळी वागणूक देत होतो. मात्र आता टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये राहणाऱ्या तसेच करयोग्य उत्पन्न असणाऱ्यांबद्दल आम्ही निर्णय घेणार आहोत. १८ ते २० टक्क्यांच्या घरातील हे लहान करदाते आमच्या यंत्रणेशी जुळल्यास सरकार एकूण करांमध्ये हळूहळू कपात करू शकते. लोकांवरील करांचा बोझा त्यामुळे कमी होऊ शकतो, असे त्या म्हणाल्या. तूर्तास आम्ही धरपकड करणार नाही. घराघरात जाऊन सर्वेक्षण करण्याचीही तूर्तास आमची योजना नाही. मात्र आयकर विभाग आपल्याबद्दल जाणून आहे, हे करदात्याला स्वत:च समजेल, अशी व्यवस्था आम्ही आणणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)
वार्षिक चार लाखांचे उत्पन्न असणारे आयकर विभागाच्या रडारवर
By admin | Published: September 28, 2015 2:50 AM