चेन्नई- गुरूवारी सकाळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी चेन्नईतील जया टीव्हीच्या ऑफिसवर छापेमारी केली आहे. आयकर विभागाच्या दहा अधिकाऱ्यांनी गुरूवारी सकाळी सहा वाजता इक्कटथुथंग येथील जया टीव्हीच्या ऑफिसवर छापेमारी केली. तसंच आयकर विभागाने डॉक्टर नामधू एमजीआरच्या (तामिळ वृत्तपत्र) ऑफिसवरही छापेमारी केली आहे. शशिकला यांच्या कुटुंबीयांशी संबंधीत काही जागा, समर्थक त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री जजललिता यांच्या कोदांद इस्टेटसह राज्यभरात 80 ठिकाणी छापेमारी सुरू आहे. ही छापेमारी देशव्यापी असून एकुण 187 ठिकाणी आयकर विभागाचे अधिकारी छापे मारत आहेत.
कर न भरल्याची माहिती मिळाल्याने जया टीव्हीच्या कार्यालयासह इतर ठिकाणी छापे टाकण्यात आल्याची माहिती आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ‘करचोरी करण्यात आल्याची माहिती मिळाल्याने छापे टाकण्यात आले असून वाहिनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे,’ अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ऑपरेशन क्लीन मनीच्या अंतर्गत हे छापे टाकण्यात आल्याची माहिती आयकर विभागाच्या दुसऱ्या अधिकाऱ्याने दिली. आतापर्यंत तामिळनाडूमध्ये ८० ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.
बोगस कंपन्या, संशयित गुंतवणूक यांच्याबद्दलचा तपास करण्यासाठी आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आले. या प्रकरणावर भाष्य करताना, ही कारवाई राजकीय हेतूने करण्यात आल्याचा आरोप जया टीव्हीच्या वकिलांनी केला. ‘केंद्र सरकारकडून जाणूनबुजून कारवाई केली जात आहे. सरकारच्या या कारवाईने आम्ही घाबरणार नाही. आम्ही कायदेशीर संघर्ष करु,’ अशी प्रतिक्रिया जया टीव्हीच्या वकिलांनी दिली.
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी जया टीव्ही सुरू केलं. या टीव्ही चॅनेलचं नियंत्रण सध्या तुरूंगात असणाऱ्या एआयएडीएकेच्या नेत्या शशिकला यांच्या कुटुंबातील सदस्यांकडे आहेत. या टीव्हीचं नेतृत्व शशिकला यांचा पुतण्या विवेक जयरामण करतात.
जया टीव्हीच्या ऑफिसवरील छापेमारीनंतर आयकर विभागाने शशिकला यांचा पुतण्या विवेक जयरामण यांच्या घरावर आणि जाज सिनेमासमध्येही सर्च ऑपरेशन केलं. जाज सिनेमास शशिकला यांच्या कुटुंबीयांच्या मालकीचं आहे.