नवी दिल्ली: माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आले आहेत. वाड्रा यांच्याकडे असणाऱ्या 42 कोटी रुपयांच्या बेहिशोबी रकमेप्रकरणी त्यांना प्राप्तिकर विभागानं नोटीस पाठवली आहे. याप्रकरणी वाड्रा यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी 30 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. रॉबर्ट वाड्रा यांचं बेहिशोबी रक्कम प्रकरण स्कायलाईट हॉस्पिटॅलिटीशी संबंधित आहे. यामध्ये वाड्रा यांची 99 टक्के मालकी आहे. वाड्रा यांनी या प्रकरणातील आदेशांना उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र दोन्ही न्यायालयांनी त्यांची याचिका फेटाळून लावली. 'माझी कंपनी लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपमध्ये होती. मात्र प्राप्तिकर विभागानं दिलेल्या नोटिशीमध्ये या कंपनीचा उल्लेख प्रायव्हेट लिमिटेड पार्टनरशिप असा करण्यात आला आहे,' असं वाड्रा यांनी याचिकेत नमूद केलं होतं. गेल्या वर्षी या प्रकरणात सक्तवसुली संचलनालयानं जयप्रकाश बागरवा आणि अशोक कुमार यांना अटक केली होती. अशोक कुमार स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडचे महेश नागर यांचे निकटवर्तीय आहेत. बागरवा आणि कुमार यांनी पीएमएलए अंतर्गत अटक करण्यात आली होती. यानंतर या दोघांची चौकशी करण्यात आली. स्कायलाईट हॉस्पिटॅलिटीकडून बिकानेरमध्ये चार जमीन खरेदीचे व्यवहार झाले. यामध्ये नागरच स्कायलाईट हॉस्पिटॅलिटीचा अधिकृत प्रतिनिधी होता.
रॉबर्ट वाड्रांकडील 'ते' ४२ कोटी प्राप्तिकर खात्याच्या रडारवर; नोटीस पाठवली!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 7:02 PM