नवी दिल्ली : नोटाबंदीच्या काळात म्हणजे ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०१६ या काळात बँक खात्यांमध्ये मोठ्या रकमांचा भरणा करणाऱ्यांपैकी ज्यांचे व्यवहार त्यांच्या ताज्या प्राप्तिकर रिटनर्शी मेळ खात नाहीत असे १८ लाख करदाते प्राप्तिकर विभागाने हुडकून काढले असून त्यांना नोटिसा पाठविण्यात येत आहेत.वित्त मंत्रालयातील महसूल विभागाचे सचिव हसमुख अढिया यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले की, नोटाबंदीच्या काळात बँक खात्यांमध्ये केल्या गेलेल्या मोठ्या व्यवहारांची सर्व माहिती देण्यास बँकांना सांगण्यात आले होते. ‘डेटा अॅनेलेटिक्स’ तंत्राचा वापर करून आता या माहितीचे विश्लेषण करण्याची ‘आॅपरेशन क्लीन मनी’ नावाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने एका निवेदनात सांगितले की, प्राप्तिकर विभागाकडे प्राप्तिकर रिटर्न भरलेल्या सर्व करदात्यांचा डेटाबेस उपलब्ध आहे. नोटाबंदीच्या काळात बँकांमध्ये केले गेलेले मोठ्या रकमांचे व्यवहार ‘डेटा अॅनेलेटिक्स’ तंत्र वापरून या टेडाबेसशी ताडून पाहिले जात आहेत. ज्यांचे व्यवहार त्यांच्या ताज्या प्राप्तिकर रिटर्नशी विसंगत असल्याचे सकृद्दर्श नी दिसते त्यांचे वर्गीकरण केले जात आहे. या निवेदनानुसार ‘आॅपरेशन क्लीन मनी’च्या पहिल्या टप्प्यात असे सुमारे १८ लाख करदाते आढळून आले आहेत. त्यांना नोटिसा पाठवून १० दिवसांत खुलासा करण्यास सांगण्यात येत आहे. करदात्यांकडून होणारा खुलासा समाधानकारक वाटला नाही तर त्यांच्याविरुद्ध पुढील कारवाई केली जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)पोर्टलवर खुलासा कराज्यांना या नोटिसा पाठविल्या जातील त्यांना आपला खुलासा प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलरवरही करता येईल. यासाठी पोर्टलवर मार्गदर्शन उपलब्ध असेल.खातेदारांना त्यांच्या आक्षेप घेतलेल्या व्यवहारांचे ‘आॅनलाइन व्हेरिफिकेशन’ही करता येईल. याची सूचना संबंधित करदात्यांना ई-मेल व एसएमएसने दिली जाईल.
१८ लाख करदात्यांना प्राप्तिकराच्या नोटिसा
By admin | Published: February 01, 2017 1:21 AM