अमृतसर : पंजाबमध्ये शेतीमालाच्या खरेदी-विक्री व्यवहारातील सुमारे १४ बड्या अडत्यांना प्राप्तिकर खात्याने नोटिसा बजावल्या आहेत. त्यातील काही जणांवर या खात्याच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या आहेत. शेतकरी आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्यामुळे आम्हाला धमकाविण्यासाठी केंद्र सरकारने ही कारवाई केली आहे, असा या अडत्यांचा आरोप आहे.त्यातील एका अडत्याने सांगितले की, मला बजावण्यात आलेली नोटीस घेऊन मी प्राप्तिकर खात्याच्या कार्यालयात गेलो. तिथे संबंधित अधिकाऱ्यांना भेटलो असता, तेही हतबल असल्याचे दिसून आले. अडत्यांना नोटिसा पाठविण्याचा, त्यांच्यावर धाडी टाकण्याचा आदेश दिल्लीवरूनच आला आहे, असे प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले, असा दावा या अडत्याने केला. शेतकरी आंदोलनात सहभागी होऊ नका, त्यांना पाठिंबा देऊ नका, असा इशारा प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी आम्हाला दिला, असे एक अडत्या म्हणाला. नोटिसा पाठवून, धाडी टाकून केंद्र सरकारने आमचा छळ सुरू केला आहे, पण या कारवाईला आम्ही घाबरणार नाही. नवे कृषी कायदे रद्द करेपर्यंत शेतकऱ्यांची ही लढाई सुरूच राहील, असेही एका अडत्याने सांगितले. (वृत्तसंस्था)
देशवासीयांना आवाहन२३ डिसेंबर रोजी चौधरी चरणसिंग यांच्या स्मृतिदिनानिमित्त देशभरात किसान दिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी अन्नदाता शेतकऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्व देशवासीयांना दुपारचे जेवण न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- सोमवारपासून दिल्ली बॉर्डरवरील सर्व आंदोलन स्थळांवर ११ प्रतिनिधी साखळी उपोषणाला बसणार. देशभरातील ज्या-ज्या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी देखील साखळी उपोषण सुरू करण्याचे आवाहन.
- जगभरातील भारतीय नागरिकांना त्या-त्या देशांमध्ये धरणे आंदोलन करून भारतीय दूतावासामध्ये निवेदन देण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
- एनडीएमधील भाजपेतर सर्व घटक पक्षांना शेतकरी विरोधी कायद्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी व सदरचे कायदे रद्द करण्यासंदर्भात केंद्र सरकारवर दबाव आणावा असे आवाहन करण्यात येणार आहे.
- दि.२७ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात करणार आहेत, सदरची मन की बात आम्हाला ऐकायची नाही असा संदेश देण्यासाठी या मन की बात संबोधनादरम्यान देशातील सर्व नागरिकांनी टाळ्या, थाळ्या वाजवून निषेध व्यक्त करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
- संयुक्त किसान मोर्चाचे जगजीत सिंह डल्लेवाल, योगेंद्र यादव, राकेश टिकेत, डॉ. दर्शन पाल, ऋदुल सिंह मानसा, जसविंदर सिंह बाटी यांनी पत्रकार परिषदेस संबोधित केले.
- या बैठकीत महाराष्ट्रातील राष्ट्रीय किसान महासंघाचे कोअर कमिटी सदस्य संदीप आबा गिड्डे- पाटील व राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शंकर दरेकर उपस्थित होते.