भुवनेश्वर/रांची : आयकर विभागाचे झारखंड आणि ओडिशातील अनेक ठिकाणी मद्य उत्पादक कंपनीविरुद्धच्या करचुकवेगिरीप्रकरणी छापेमारी शनिवारी चौथ्या दिवशीही सुरूच आहे. आयकर अधिकाऱ्यांनी आतापर्यंत रोख भरलेल्या १५६ बॅग जप्त केल्या आहेत, ज्यामध्ये २२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रोकड सापडली आहे. आयकर विभागाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर अधिकाऱ्यांचे पथक शनिवारी सकाळी तीन बॅगांसह रांची येथील काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या निवासस्थानातून निघाले. धीरज साहू यांच्या घरातून जप्त केलेल्या बॅग या दागिन्यांनी भरल्या होत्या, असे सांगितले जाते.
आयकर विभागाने संबलपूर, बोलंगीर, टिटिलागड, बौध, सुंदरगड, राउरकेला आणि भुवनेश्वर येथे छापे टाकले. या छाप्याबाबत मद्य विक्री करणाऱ्या कंपनीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, मद्य कंपनीशी कथितरित्या संबंध असणारे झारखंडमधीलकाँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा मोबाईल बंद असल्याचे आढळून आले. रांची येथील त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी खासदार उपस्थित नसल्याचे सांगितले.
आयकर अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, आयकर विभागाने शुक्रवारी तिसर्या दिवशी ओडिशा-आधारित मद्य उत्पादक कंपनीवर कर आकारणीवर छापे टाकले आणि रोखीने भरलेल्या १५६ बॅग जप्त केल्या. या बॅगांमधून मिळालेल्या रोख रकमेतून आतापर्यंत २० कोटी रुपये मोजले गेल्याचे त्यांनी सांगितले. या छाप्यात आतापर्यंत २२५ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी बोलंगीर जिल्ह्यातील सुदापाडा येथे छापा टाकून रोख भरलेल्या १५६ बॅगा जप्त केल्या. एका अधिकाऱ्याने सांगितले की, '१५६ बॅगांपैकी फक्त सहा-सातची मोजणी करण्यात आली, ज्यामध्ये २५ कोटी रुपये सापडले.'
लुटलेला पैसा जनतेला परत करावा लागेल - नरेंद्र मोदीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भ्रष्टाचाराच्या मुद्यावर विरोधकांवर टीकास्त्र सोडले. जनतेकडून लुटलेला पैसा तिला परत करावा लागेल, ही 'मोदींची गॅरंटी' आहे, असे एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच, मोदींनी झारखंडमधील काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्याशी कथित संबंध असलेल्या एका व्यावसायिक समूहाच्या विविध ठिकाणांहून आयकर विभागाने २०० कोटी रुपये रोख वसूल केल्याच्या बातम्यांना टॅग केले.
कोण आहेत धीरज साहू?धीरज साहू यांच्याबद्दल बोलायचे झाले तर ते काँग्रेसचे नेते आहेत. ते झारखंडमधून राज्यसभेचे खासदार आहेत. धीरज साहू हे उद्योगपती आहेत. धीरज साहू यांचे बंधू शिवप्रसाद साहू हेही खासदार होते. धीरज यांचे कुटुंब स्वातंत्र्यापासून काँग्रेस पक्षाशी संबंधित आहे. धीरज यांनी १९७७ मध्ये राजकारणात प्रवेश केला. १९७८ च्या जेलभरो आंदोलनात ते तुरुंगातही गेले होते. जून २००९ मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आले. २०२० मध्ये धीरज प्रसिद्धीच्या झोतात आले होते, जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या निवडणुकीशी संबंधित याचिका फेटाळली होती. भाजपचे उमेदवार प्रदीप सोथनालिया यांनी त्यांच्या निवडणुकीला आव्हान दिले होते. २०१८ मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रदीप सोनथालिया यांनी धीरज साहू यांना राज्यसभेत आव्हान दिले होते.