नवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाने आज सकाळी हीरो मोटोकॉर्पचे चेअरमन आणि एमडी पवन मुंजाल यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली. मिळत असलेल्या माहितीनुसार त्यांच्या निवासस्थानांवर आणि गुडगांवमधील ऑफिसमध्ये सकाळपासून सर्च ऑपरेशन सुरू आहे.
मुंजाल यांनी त्यांच्या खात्यांमध्ये खोटे खर्च दाखवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. प्राप्तिकर विभागाने त्याबाबतच सकाळपासून छापेमारी सुरू केली आहे. प्राप्तिकर विभागाच्या पथकाला जे संशयास्पद खर्च सापडले आहेत, त्यामधील काही खर्च इनहाऊस कंपन्यांचेही आहेत. दरम्यान, ही छापेमारी पुढेही सुरू राहणार आहे.
मात्र या छापेमारीबाबत हीरो मोटोकॉर्प आणि प्राप्तिकर विभागाने अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. दरम्यान, हे वृत्त येताच हीरो मोटोकॉर्पचे शेअर धडाधड कोसळले. तसेच छापेमारीबाबत माहिती मिळताच बीएसईमध्ये फायद्यात असलेला हीरो मोटोकॉर्पचा शेअर झपाट्याने खाली आला. १०.३० पर्यत हीरो मोटोकॉर्पचा शेअर २ टक्क्यांनी घसरला.