नवी दिल्ली : आयकर विभागाने शनिवारी बूट बनवणाऱ्या व्यावसायिकांवर मोठी कारवाई केली. आग्रा आणि दिल्लीसह उत्तर प्रदेशातील दोन जिल्ह्यांमध्ये व्यावसायिकांच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकले. या छापेमारी दरम्यान ४० कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बूट व्यापारी कर चुकवत असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती.
यानंतर दुपारी ३ वाजता आयकर विभागाचे अधिकारी तिन्ही कंपन्याच्या शोरूममध्ये पोहोचले आणि खरेदीसाठी आलेल्या लोकांना बाहेर काढून छापेमारी सुरू केली. सध्या छापेमारी सुरू असून अनेक कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. आयकर विभागाचे पथक फाइल्स आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी करत आहे. तासभर चाललेल्या या छाप्यात आतापर्यंत ४० कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पलंगाखाली नोटांचे बंडल लपवून ठेवले होते. हे पाहून अधिकारीही आश्चर्यचकित झाले आहेत.
दुसरीकडे, आयकर विभागाने शनिवारी अहमदाबाद आणि वडोदरा येथील माधव ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या ठिकाणी छापे टाकले. रिअल इस्टेट आणि सरकारी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी प्रसिद्ध असलेल्या समूहाच्या दोन्ही शहरांतील २७ ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले. शनिवारी सकाळपासून सुरू झालेला हा छापा अजूनही सुरूच आहे. अधिकारी त्याच्या व्यवहारांची चौकशी करत आहेत. आयकर विभागाचे ५० हून अधिक अधिकारी छापे टाकत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वडोदरा येथील सुभानपुरा येथील समूहाच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आले होते. कर्नाटक, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि महाराष्ट्रात अस्तित्व असलेल्या माधव ग्रुपची २०१० मध्ये स्थापना झाल्यापासून चौकशी सुरू आहे. हा समूह ऊर्जा, रिअल इस्टेट, महामार्ग आणि शहरी पायाभूत सुविधांसह विविध क्षेत्रात कार्यरत आहे.