बंगळुरू : कर्नाटकातील मंड्या आणि हसन जिल्ह्यातील जेडीएस नेत्यांशी संबंधित लोकांच्या ठिकाणांवर मंगळवारी प्राप्तिकर विभागाने छापे मारले. या दोन्ही मतदारसंघांतून जेडीएसप्रमुख एच.डी. देवेगौडा यांचे दोन नातू निखिल कुमारस्वामी आणि प्रज्वल रेवण्णा हे लोकसभेची आपली पहिली निवडणूक लढत आहेत.सूत्रांनी सांगितले की, प्रत्येकी १५ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या चार पथकांनी ही कारवाई केली. जेडीएस नेत्यांशी संबंधित असलेल्या लोकांची कार्यालये, निवासस्थाने आणि कारखाने याठिकाणी तपासणी करण्यात आली. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांचे संरक्षण कारवाईसाठी घेण्यात आले होते.कर्नाटकात जेडीएस आणि काँग्रेस यांची आघाडी आहे. दोन्ही पक्षांनी केंद्र सरकारवर केंद्रीय संस्थांचा गैरवापराचा आरोप केला. याआधीही २८ मार्च रोजी दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी संबंधित ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. या धाडी सुरू होताच मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी, माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आयकर विभागाच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली होती.प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, हसन, मंड्या आणि बंगळुरू येथे प्राप्तिकर विभागाच्या वतीने धाडी टाकण्यात आल्या असून, तपासणी सुरू आहे. (वृत्तसंस्था)>हसन, बंगळुरू, मंड्यामध्ये तपासणीविश्वसनीय गुप्तचर माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात येत आहे. ज्यांच्यावर धाडी टाकण्यात आल्या ते लोक रिअल इस्टेट, खाणी, स्टोन क्रशिंग, सरकारी कंत्राटदारी, पेट्रोलपंप, सॉ मिल आणि सहकारी बँका या व्यवसायांत आहेत. हसनमधील ५ निवासस्थाने, तसेच बंगळुरू आणि मंड्यामधील प्रत्येकी एका निवासस्थानी तपासणी करण्यात येत आहे. या लोकांच्या व्यावसायिक ठिकाणांवरही धाडी टाकणे सुरू आहे.
जेडीएस नेत्यांशी संबंधित ठिकाणी प्राप्तिकर छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 4:08 AM