350 कोटी सापडलेल्या धीरज साहूंनी जमिनीखाली लपवला खजिना?; 8 व्या दिवशी छापेमारी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 10:23 AM2023-12-13T10:23:36+5:302023-12-13T10:25:25+5:30
Dheeraj Sahu Cash: खासदार धीरज साहू यांनी जमिनीच्या आतमध्ये खजिना लपवल्याचा आयकर विभागाच्या टीमला संशय आहे. त्यामुळेच सलग आठ दिवस आयकर अधिकारी त्यांच्या घरासह परिसरात कारवाई करत आहेत.
काँग्रेस खासदार धीरज प्रसाद साहू यांच्यावर आयकर विभागाची कारवाई सुरू असून आतापर्यंत त्यांच्याकडून तब्बल 350 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ओडिशाच्या बोलंगीर जिल्ह्यातील देशी दारू उत्पादन युनिटशी संबंधित परिसरावर छापे टाकल्यानंतर आता आयकर विभागाची नजर खासदार धीरज साहू यांच्या रांची येथील निवासस्थानावर आहे, जिथे छापेमारी सुरू आहे. खासदार धीरज साहू यांनी जमिनीच्या आतमध्ये खजिना लपवल्याचा आयकर विभागाच्या टीमला संशय आहे. त्यामुळेच सलग आठ दिवस आयकर अधिकारी त्यांच्या घरासह परिसरात कारवाई करत आहेत.
मंगळवारी धीरज साहू यांच्या घराची जिओ सर्व्हिलन्स सिस्टमद्वारे झडती घेण्यात आली. पैसे आणि दागिने जमिनीखाली लपवलेले असावेत असा आयकर विभागाच्या टीमला संशय होता, त्यामुळेच टीमने या तंत्राचा अवलंब केला. GEO सर्व्हिलन्स सिस्टमच्या मदतीने छापा टाकल्यानंतर खासदार धीरज साहू यांच्या निवासस्थानी हालचाल वाढली. खासदार धीरज साहू यांच्या परिसरातून आतापर्यंत 300 रुपयांहून अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे.
यापूर्वी आयकर विभागाने ओडिशाच्या बोलंगीर जिल्ह्यातील देशी दारू उत्पादन युनिटशी संबंधित परिसरात शोध मोहिमेदरम्यान 350 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेहिशेबी रोकड आणि सुमारे तीन किलोग्राम सोने जप्त केले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की छापा पूर्ण होताच आयकर पथकाने सुतापाडा येथील कंपनीच्या दोन व्यवस्थापकांना चौकशीसाठी अज्ञात ठिकाणी नेले. ही कंपनी झारखंडचे रहिवासी काँग्रेस खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या कुटुंबाची आहे.
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी 6 डिसेंबर रोजी ओडिशातील सहा ठिकाणी शोध मोहीम सुरू केली. बँक कर्मचार्यांसह 200 हून अधिक लोक बोलंगीर आणि संबलपूरमध्ये रोख शोधण्यात आणि मोजण्यात गुंतले होते. बोलंगीर, तितलागड, बौद्ध, राउरकेला, सुंदरगड आणि भुवनेश्वर येथे छापे टाकण्यात आले. छाप्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आयकर विभागाचे महासंचालक संजय बहादूर भुवनेश्वरमध्ये तळ ठोकून होते.