नवी दिल्ली - इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठीची अंतिम मुदत ही ३१ जुलै रोजी समाप्त होणार आहे. जर तुम्ही कराच्या चौकटीत येत असाल आणि आतापर्यंत आयटीआर फाईल केला नसेल तर हे काम त्वरित आटोपून घ्या. जर निश्चित तारखेनंतर आयटीआर दाखल केल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. त्यामुळे प्राप्तिकर विभागाने करदात्यांना वेळीच आयटीआर फाईल करण्यास सांगितले आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळीही सरकारडून आयटीआर भरण्यासाठी मुदवाढ मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र याबाबत प्राप्तिकर विभागाने महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
३१ जुलैपर्यंत सुमारे सात कोटी आयटीआर फाईल होतात. मात्र २८ जुलैपर्यंत हा आकडा पाच कोटींपर्यंत पोहोचला नव्हता. अशा परिस्थितीत शेवटच्या दोन दिवसांमध्ये रिटर्न फायलिंग पोर्टलवरील लोड वाढू शकतो आणि सिस्टिम स्लो होऊ शकते. दरम्यान, वेळेवर आयटीआर फाईल करण्याचे अनेक फायदे आहेत. जर तुम्हाला तुमचा रिफंड राहिला असेल तर तुम्ही जेवढ्या लवकर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल कराल, तेवढ्या लवकर तुम्हाला रिफंड मिळू शकतो.
इन्कम टॅक्स इंडियाने ट्विट करून सांगितले आहे की, २८ जुलै २०२२ पर्यंत ४.०९ कोटींहून अधिक जणांनी आपलं आयटीआर फाईल केलं होतं. २८ जुलै रोजी ३६ लाख हून अधिक जणांनी आयटीआर फाईल केले होते. २०२२-२३ या वर्षासाठी आयटीआर फाईल करण्यासाठी शेवटची तारीख ३१ जुलै आहे. जर तुम्ही आतापर्यंत आयटीआर फाईल केलं नसेल तर त्वरित फाईल करा आणि दंड भरण्यापासून वाचा.
इन्कम टॅक्स इंडियाने आपल्या ट्वीटमध्ये स्पष्टपणे सांगितले की, ३१ जुलैपर्यंत आयटीआर फाईल करा आणि लेट फाईन भरण्यापासून वाचा. याचा अर्थ १ ऑगस्टपासून आयटीआर फाईल केल्यास दंड भारावा लागेल. वेळेवर रिटर्न फाईल करून तुम्ही या दंडात्मक कारवाईपासून वाचू शकता.
डेडलाईननंतर आयटीआर फाईल केल्यास दंड भरावा लागू शकतो. डेडलाईननंतर रिटर्न फाईल केल्यास पाच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असल्यास एक हजार रुपये लेट फीस द्यावी लागेल. पाच लाख पेक्षा अधिक उत्पन्नावर लेट फीस ५ हजार रुपये असेल. तर ही रक्कम वाढून १० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते.