हरीश गुप्ता, नवी दिल्लीदुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागात शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत असताना दिल्ली आणि चंदीगडसारख्या शहरांमध्ये मात्र शेतकऱ्यांची भरभराट होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.गोवा आणि देशाच्या अन्य भागात शेतकऱ्यांनी स्वस्त दराचे कर्ज उचलण्यात मोठी घट झाली आहे. याउलट राजधानी दिल्लीत मात्र शेतकऱ्यांच्या नावावरील कर्जात भरमसाट म्हणजे दुपटीपेक्षा जास्त वाढ झाल्याचे प्रकाशात आले आहे. २०१३-१४ मध्ये दिल्लीवासी शेतकऱ्यांनी ७७१९.२३ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. २०१४-१५ यावर्षात ते दुपटीवर म्हणजे १५,९१४.४३ कोटीपर्यंत वाढले. या वर्षातील कर्जबाजारी शेतकऱ्यांची संख्या मात्र कमी होऊन १६,९७९ झाली. २०१३-१४ मध्ये शेतकऱ्यांची संख्या ६३,०९४ एवढी दाखविण्यात आली. याचा अर्थ कर्जाची रक्कम दुप्पट म्हणजे १०० टक्क्यांनी वाढली; मात्र प्रत्यक्षात लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत ४०० टक्क्यांची घट झाली. अन्य क्षेत्रात व्याजदर १४ टक्के असताना कृषी कर्जाचा व्याजदर ४ ते ७ टक्के एवढाच आहे. शेतीच्या नावावर कर्ज उचलण्याचे हे कारणही त्यातून स्पष्ट होते. चंदीगडच्या शेतकऱ्यांनी २०१४-१५ या वर्षात २४१७.३९ कोटी रुपये एवढे सवलतीचे कर्ज घेतले. याआधीच्या वर्षातील कर्जाची रक्कम १७३० कोटी रुपये होती. तुुलनेत ते ४० टक्क्यांनी जास्त आहे. या शहरातील शेतकऱ्यांची संख्या मात्र जवळपास ३५० टक्क्यांनी कमी झाली आहे.१० हजार कोटींची घसरणतथापि हे सर्व शेतीवर अवलंबून असलेल्या महाराष्ट्र आणि गोव्याच्या बाबतीत पूर्णपणे विसंगत आहे. महाराष्ट्रातील कर्ज वाटपात १०,००० कोटींची घसरण झाली आहे. २०१३-१४ या वर्षात राज्यात ७२,७४९ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले होते. परंतु २०१४-१५ मध्ये हा आकडा ६२,७२५ कोटींपर्यंत घसरला. आश्चर्याची बाब अशी की, याच काळात कृषी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मात्र पाच लाखांनी वाढली. २०१३-१४ मध्ये २४.७३ लाख शेतकऱ्यांनी कृषी कर्ज घेतले होते. ही संख्या २०१४-१५ मध्ये २९.३६ लाखांवर पोहोचली. गोव्यातही महाराष्ट्राचीच पुनरावृत्ती झाली आहे.
दिल्लीत कृषी कर्जात वाढ; लाभार्थी घटले
By admin | Published: April 06, 2016 10:16 PM