- एस. पी. सिन्हा। लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणा : भ्रष्टाचाराचा आरोप असलेले बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वीप्रसाद यादव यांच्या मागणीवरून बिहार सरकारमधील संयुक्त जनता दल व राष्ट्रीय जनता दल यांच्यातील तणाव वाढत चालला आहे. यादव यांना राजीनाम्यासाठी चार दिवसांची मुदत शुक्रवारीच संपली असून, राज्य सरकारच्या एका कार्यक्रमाला त्यांनी शनिवारी दांडीच मारली.जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त सरकारने पाटण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री नितीश कुमार व तेजस्वीप्रसाद यादव प्रमुख पाहुणे होते. मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला वेळेवर पोहोचले. पण काहीही कारण न देता यादव तिथे गेलेच नाहीत. ते येणार हे गृहित धरून, तिथे टेबलावर त्यांच्या नावाची पट्टी (नेमप्लेट) ठेवली होती. पण ते न आल्याने त्यावर आधी कापड टाकण्यात आले आणि नंतर तर ती पट्टीच टेबलावरून काढूनच टाकण्यात आली.संयुक्त जनता दलाने दिलेली चार दिवसांची मुदत संपली तरी यादव यांनी राजीनामा दिलेला नाही आणि त्यांनी राजीनामा देण्याची गरजच नाही, असे राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी जाहीरच केले आहे. त्यामुळे दोन पक्षांतील तणाव वाढला आहे. यादव यांना नितीश कुमार यांनी काढून टाकले, तर लालूप्रसाद यादव सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतील आणि सरकार कोसळेल, असे बोलले जात आहे. अर्थात सरकार स्थिर असल्याचे लालूप्रसाद यांनी बोलून दाखवले आहे.काहींच्या मते राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर तेजस्वीप्रसाद राजीनामा देऊ शकतील. त्यानंतरही राजद सरकारमध्ये राहील आणि त्याबदल्यात लालूप्रसाद तेजप्रताप याला उपमुख्यमंत्रीपद द्यावे, असा आग्रह धरतील, असा अंदाज आहे.सोनिया गांधींची मध्यस्थी : लालूप्रसाद यादव व नितीश कुमार यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी प्रयत्नशील असल्याचे कळते. त्यांनी शुक्रवारी दोन्ही नेत्यांशी फोनवरून बातचीत केली आणि लालूप्रसाद यांना काहीसे नमते घेण्यास सांगितले, असे कळते.