मद्यपींचा परवाना होणार रद्द कारवाईत वाढ : ठोस कारवाईसाठी वाहतूक पोलिसांचे प्रयत्न
By admin | Published: August 07, 2015 9:35 PM
सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई : मद्यपान करून वाहन चालवणार्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. सहा महिन्यांत ७२१ मद्यपींवर कारवाई झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे. त्यामुळे मद्यपान करून वाहन चालवणार्यांवर ठोस कारवाईच्या उद्देशाने त्यांचा परवाना रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई : मद्यपान करून वाहन चालवणार्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. सहा महिन्यांत ७२१ मद्यपींवर कारवाई झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे. त्यामुळे मद्यपान करून वाहन चालवणार्यांवर ठोस कारवाईच्या उद्देशाने त्यांचा परवाना रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत.मद्यपान करून वाहन चालवणार्यांवर कारवाई करण्याची मोहीम वाहतूक पोलिसांनी तीव्र केली आहे. शहरात रस्त्यांवर, चौकात नाकाबंदी करून या कारवाया होत आहेत. नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी गतवर्षी एकूण ११०४ जणांवर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई केली होती. त्यांच्याकडून दंड स्वरूपात १० लाख २१ हजार रुपये जमा झालेले होते. तर २०१५ या चालू वर्षात जून अखेरपर्यंत ७२१ जणांवर ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ८ लाख ६८ हजार रुपयांची दंडाची रक्कम जमा झालेली आहे. ही संख्या गतवर्षीच्या जून अखेरपर्यंतच्या कारवाईच्या दुप्पट आहे. परंतु कारवाया करूनही अशा प्रकारांना आळा बसलेला नाही. वाहतूक पोलिसांनी केलेल्या या कारवाईच्या ठिकाणांत पामबीच मार्गाचाही समावेश आहे. वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे पामबीच मार्ग जीवघेणा ठरत आहे. मद्यपान करून वाहने चालवली जात असल्याने अपघातांचे प्रमाण मोठे आहे. अशा अपघातामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागतात. त्यामुळे मद्यपान करून वाहन चालवणार्यांवर वाहतूक पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत. परंतु अनेकांवर एकापेक्षा जास्त वेळा कारवाया होवूनही त्यांच्यावर वचक बसलेला नाही. वाहतूक पोलीस चलन फाडताच न्यायालयात एक हजार रुपये दंड भरल्यानंतर पुन्हा मोकळे, असा मद्यपी वाहन चालकांचा समज झाला आहे. त्यामुळे एकदा ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई झाल्यानंतरही पुढच्या कारवाईला ते तयार असतात. याचा मनस्ताप वाहतूक पोलिसांना होत आहे. कायद्याची भीती निर्माण व्हावी यासाठी मद्यपी वाहन चालकांवर कडक कारवाईची गरज असल्याचे मत त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.अनेक शहरांमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईत संबंधित चालकाच्या परवान्यावर रिमार्क दिला जातो. पुन्हा तीच व्यक्ती कारवाईत आढळल्यास त्याला कठोर कारवाईला सामोरे जावे लागते. अशीच कारवाई नवी मुंबईत करण्यसाठी वाहतूक पोलिसांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यावर लवकरच अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)..........वाहतूक पोलिसांकडून सातत्याने ड्रंक अँड ड्राईव्हवर कारवाया केल्या जात आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीने कारवाया केल्या आहेत. अनेक जणांवर वारंवार एकच कारवाई करावी लागत आहे. त्याकरिता पहिल्याच कारवाईत त्यांचा परवाना रद्द करावा असा निर्णय घेण्याची मागणी न्यायालय व आयुक्तांकडे केली जाणार आहे.- अरविंद साळवे, वाहतूक पोलीस उपआयुक्त