सिडको : सातपूर - अंबड लिंकरोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीत वाढ झाली असून, अवैधधंदेदेखील वाढले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, या नागरिकांच्या सुरक्षेसाठी याठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात यावी यासाठी शिवसेनेच्या वतीने पोलीस उपायुक्तांना निवेदन देण्यात आले.सातपूर - अंबड लिंकरोड परिसरातील केवल पार्क येथे पोलीस चौकी उभारून चोवीस तास पोलीस कर्मचार्यांचीही नेमणूक करावी या मागणीसाठी शिवसेनेचे महानगर समन्वयक दिलीप दातीर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपआयुक्त विजय पाटील यांना निवेदन देण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून केवल पार्क, अष्टविनायकनगर, लक्ष्मण टाउनशिप या परिसरात भंगार बाजारातील टवाळखोरांकडून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. येथील उद्यानात तसेच मोकळ्या जागेत मद्यपान, मारामार्या करणे, तसेच त्यांच्याकडील असणार्या गावठी बंदुकांचा धाक देणे, तलवार, कोयते, लोखंडी रॉड अशा प्रकारच्या हत्यारांचा सर्रास वापर करणे, रस्त्याने ये-जा करणार्यांना शिवीगाळ करण्याबरोबरच महिला व मुलींची छेड काढण्याचे प्रकारही घडत असल्याने परिसरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याच भागात गेल्या अनेक वर्षांपासून असलेला अनधिकृत भंगार बाजारामुळेच याठिकाणी गुन्हेगारीचे प्रकार घडत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. पोलीस उपआयुक्तांना निवेदन देताना दिलीप दातीर, पंकज दातीर, गोरख घाटोळ, गोरख काळोगे, गिरीश ठाकरे, सागर जाधव, सिद्धेश घुमरे, विकास पाटील, रोहित खैरनार, यशवंत पवार, ज्ञानेश्वर काळे, किरण निगळ, योगेश जाधव, दीपक फडोळ, धनंजय निगळ, आकाश खर्जुल आदि सहभागी झाले होते. (वार्ताहर)सातपूर - अंबड लिंकरोड परिसरात असलेल्या अनधिकृत भंगार बाजारामुळे गुन्हेगारीत वाढ झाली आहे. येथील गुन्हेगार सर्रासपणे धारदार शस्त्रांचा तसेच बंदुकीचा धाक दाखवित असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याचबरोबर अवैधधंद्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढतच असल्याने याठिकाणी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने भंगार बाजार हटविण्याबरोबरच याठिकाणी त्वरित पोलीस चौकी उभारणे गरजेचे आहे.दिलीप दातीर, महानगर समन्वयक, शिवसेना
सातपूर-अंबड लिंकरोडवर गुन्हेगारीत वाढ अवैधधंदे तेजीत : पोलीस चौकीची मागणी
By admin | Published: September 18, 2016 10:35 PM