ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - पाकिस्तानला विरोध दर्शवत बीसीसीआयच्या कार्यालयात धुडगूस घालणा-या महाराष्ट्रातील आपला सहकारी पक्ष शिवसेनेला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी मंगळवारी चांगलेच खडवसावले असून विध्वसंक कृतीत सहभागी न होता, चर्चेची पातळी वाढवणे महत्वाचे आहे, असे जेटली म्हणाले. वैचारिक मतभेद असू शकतात, पण विरोधासाठी विरोध न करता तर्कशुद्ध पद्धतीने आपले विचार मांडले पाहिजेत असेही ते सांगितले.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान मुंबईत आल्याच्या निषेधार्थ सोमवारी शिवसैनिकांनी बीसीसीआयच्या कार्यालयात आंदोलन केले होते. तसेच गेल्या आठवड्यात शिवसैनिकांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री खुर्शीद कसुरींच्या पुस्तक प्रकाशनास विरोध दर्शवत आयोजक सुधींद्र कुलकर्णींच्या चेह-याला काळे फासले होते. त्यापूर्वी शिवसेनेने पाकिस्तानी गझलगायक गुलाम अली खान यांना विरोध दर्शवल्याने त्यांचा मुंबई व पुण्यातील कार्यक्रम रद्द झाला होता. याबद्दल सर्व स्तरातूंन निषेध व्यक्त होत असतानाही ही देशभावना असल्याचे सांगत शिवसेनेने आपल्या कृतीचे समर्थन केले होते. त्याच पार्श्वभूमीवर अरूण जेटलींनी शिवसेनेला खडे बोल सुनावले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून काही लोक आपली बाजू , विचार मांडण्यासाठी विध्वंसाचा आधार घेत असून हे अतिशय व्यथित करणारे आहे. विरोध करण्यासाठी देशात वापरण्यात येणारी ही पद्धत चुकीची आहे. भडक आंदोलनांना दिले जाणारे प्रोत्साहन चिंताजनक बाब असून अशा पद्धतीचा मार्ग अनेक जण अवलंबत आहेत, अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली आहे. लोकशाही पद्धतीने विरोध झाला पाहिजे तसेच चर्चेतून मार्ग काढला पाहिजे असे सांगतानाच आपण लोकशाहीच्या मार्गाने विरोध करत आहोत का? आणि आपल्यामुळे देशाची बदनामी होत आहे का? याबद्दल आंदोलकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.