ईडीने अटक केल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या हेमंत सोरेन यांच्या कोठडीत आणखी पाच दिवसांची वाढ करण्यात आली आहे. पीएमएलए कोर्टाने सोरेन यांना ही कोठडी सुनावली. दरम्यान, ईडीच्या चौकशीत सोरेन यांना त्यांचा जवळचा सहकारी बिनोद सिंग याच्याशी व्हॉट्सअॅपवरील जमिनींच्या देवानघेवाण, कागदपत्रांच्या चॅटवरून प्रश्न विचारण्यात आले.
या चॅट्समध्ये अनेक मालमत्तांशी संबंधित गोपनीय माहितीची देवाणघेवाणच नाही तर ट्रान्सफर पोस्टिंग, सरकारी रेकॉर्डची देवाणघेवाण इत्यादींशी संबंधित प्रकरणांचा समावेश आहे. बिनोद सिंग यांनी अधिकाऱ्यांची बदली पोस्टिंग, झारखंड स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे आयोजित स्पर्धा परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांची अनेक प्रवेशपत्रे मागविणे आणि शेअर करणे या संबंधात इतर अनेक लोकांशी व्हॉट्सॲप चॅट केले आहेत. यावरही ईडीला कारवाई करायची आहे.
हेमंत सोरेन न्यायालयात हजेरीसाठी पोहोचले असता, न्यायालयाच्या आवारात उपस्थित असलेल्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. जेल का ताला टूटेगा, हेमंत सोरेन छूटेगा, अशा घोषणा दिल्या. ईडीच्या पथकाने हेमंत सोरेन यांना ३ फेब्रुवारी रोजी रिमांडवर घेतले होते. तेव्हापासून त्यांची चौकशी सुरू होती.