नवी दिल्ली : कृषी क्षेत्रासह औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्याचा निर्णय गुरुवारी केंद्र सरकारने घेतला. ही वाढ कौशल्ये आणि क्षेत्रानुसार भिन्न आहे.
केंद्रीय श्रम आयुक्तांनी यासंबंधीची अधिसूचना जारी केला असून वाढलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्यात आल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. किमान वेतन कायदा १९४८ अन्वये केंद्र आणि राज्य सरकारे अशा दोघांनाही आपापल्या अखत्यारीतील क्षेत्रातील कामगारांचे किमान वेतन ठरविण्याचा अथवा त्यात सुधारणा करण्याचा अधिकार आहे.
बांधकाम मजूर, मालाची चढ-उतर करणारे कामगार, सुरक्षा रक्षक, चौकीदार, घरगुती कामगार, खाण कामगार आणि शेतमजूर यांना याचा लाभ हाेणार आहे. याआधीची किमान वेतनातील वाढ यंदा एप्रिलमध्ये करण्यात आली होती. किमान वेतनाची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे.
राेज किती मिळावे, महिन्याला किती असावे?
बांधकाम, स्वच्छता, सफाई, माल चढ-उतार क्षेत्रातील अकुशल कामगारांचे किमान वेतन आता ७८३ प्रति दिन अथवा २०,३५८ रुपये प्रतिमहिना (जे अधिक असेल ते). अर्धकुशल कामगारांसाठी ते ८६८ रुपये प्रतिदिन अथवा २२,५६३ रुपये प्रतिमहिना. लिपिक आणि निशस्त्र सुरक्षा रक्षकांसाठी ते ९५४ रुपये प्रतिदिन अथवा २४,८०४ रुपये प्रतिमहिना. सशस्त्र सुरक्षा रक्षकांसाठी किमान वेतन १,०३५ रुपये अथवा २६,९१० रुपये प्रतिमाह निश्चित करण्यात आले आहे.