नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे झालेल्या सामाजिक परिणामांमुळे देशभरात गेल्या दोन वर्षांत बेपत्ता झालेल्या मुलांचे प्रमाण वाढले आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीनुसार २०१९ मध्ये ४८ हजार, तर २०२० मध्ये ५९ हजार मुले बेपत्ता झाली. अशा मुलांची या दोन वर्षांतील एकूण संख्या एक लाखाहून अधिक आहे. त्यामध्ये बेपत्ता मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे.
या स्थितीबाबत चिंता व्यक्त करीत स्वयंसेवी संस्थांनी म्हटले आहे की, बेपत्ता मुलांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी गावपातळीवर बालरक्षण समित्यांची तातडीने स्थापना केली जावी. तसेच बालकांच्या पालनपोषणासंदर्भात पालकांमध्ये जनजागृती करण्याचे काम या समित्यांमार्फत करण्यात यावे. त्यासाठी पुरेसा निधी सरकारने उपलब्ध करून द्यावा.
कैलाश सत्यार्थी फाऊंडेशनशी संलग्न असलेल्या बचपन बचाओ आंदोलन (बीबीए) या संस्थेचे कार्यकारी संचालक धनंजय तिंगाल यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांत देशभरात सुमारे १२ हजार मुलांची आम्ही वेगवेगळ्या आपत्तींतून सुटका केली आहे. कोरोना साथीचे भीषण सामाजिक परिणाम झाले आहेत. मुलांची मानवी तस्करी करण्याचे प्रमाणही त्यामुळे वाढले आहे.
२०२०मध्ये बेपत्ता मुलींचे प्रमाण ७७ टक्के
२०२० मध्ये देशात मार्च ते जून या कालावधीत संपूर्ण लॉकडाऊन होता. त्यावर्षी बेपत्ता झालेल्या ५९,२६२ मुलांमध्ये १३५६६ मुलगे, ४५,६८७ मुली, नऊ तृतीयपंथीय मुलांचा समावेश आहे. २०१८ मध्ये बेपत्ता झालेल्या मुलांमध्ये मुलींचे प्रमाण ७० टक्के होते. ते प्रमाण २०१९ मध्ये ७१ टक्के व २०२०मध्ये ७७ टक्के झाले असल्याची माहिती नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या् अहवालात देण्यात आली.