विजयवाडा : पाप वाढल्याकारणानेच आंध्र प्रदेशमधील मंदिरांच्या उत्पन्नात २७ टक्के एवढी वाढ झाली आहे, असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या दोन दिवसांच्या संमेलनाचे उद्घाटन करताना चंद्राबाबू बोलत होते. ते म्हणाले, ‘लोक पाप करीत आहेत. काही लोक समस्याग्रस्त आहेत आणि त्या पापातून व समस्येतून सुटका करून घेण्यासाठी मंदिरात जाऊन प्रार्थना करीत आहेत. पाप आणि समस्या वाढल्याने लोक मंदिरात येऊन पैसे दान करीत आहेत. ही वस्तुस्थिती आहे.’ दारूच्या विक्रीत घट झाल्यामुळे राज्याच्या उत्पन्नात मोठी घट होत असल्याचे मतही चंद्राबाबू यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, जास्तीतजास्त लोक आता अयप्पा स्वामी दीक्षा घेतात आणि ४० दिवसपर्यंत दारूपासून दूर राहतात. त्यामुळे दारू विक्रीत घट होते. लोक केवळ मंदिरांनाच भेट देत नाहीत तर मन:शांतीसाठी चर्च आणि मशिदीतही जातात. मंदिर, मशीद आणि चर्च नसते तर अनेक लोक वेडेच झाले असते. (वृत्तसंस्था)
पाप वाढल्याने मंदिरांच्या उत्पन्नात वाढ - चंद्राबाबू
By admin | Published: May 26, 2016 1:58 AM