नवी दिल्ली : राज्यांनी त्यांच्या पोलीस दलामध्ये महिलापोलिसांचे प्रमाण ३३ टक्क्यांपर्यंत वाढवावे अशी सूचना केंद्रीय गृह खात्याने केली आहे. पोलीस दलात रिकाम्या असलेल्या पदांपैकी काहींचे रुपांतर महिला पोलीस शिपाई व उपनिरीक्षक पदांमध्ये करावे असेही या खात्याने म्हटले आहे.खासदार कार्ति पी. चिदंबरम यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये पोलिसांची संख्या २० लाख ९१ हजार ४८८ आहे. त्यात महिला पोलिसांची संख्या २ लाख १५ हजार ५०४ म्हणजे एकूण पोलिसांच्या फक्त १०.३० टक्के आहे.पोलीस हा भारतीय राज्यघटनेच्या सातव्या अनुसूचीच्या दुसऱ्या यादीत येणारा राज्यांच्या कक्षेतील विषय आहे. त्यामुळे पोलीस दलात महिला पोलिसांची भरती व त्यांची संख्या वाढविण्याची जबाबदारी राज्यांची आहे. पोलीस दलात पुरुष व महिला पोलिसांच्या संख्येत समतोल राखण्याचे काम राज्यांनी करायचे आहे.
विश्रांती कक्ष हवाकेंद्रीय गृहमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले की, महिला पोलिसांसाठी शासकीय निवासस्थाने तसेच वैद्यकीय उपचारांची सुविधा व पोलीस ठाण्यात विश्रांतीसाठी कक्ष या सुविधा राज्य सरकारने देणे आवश्यक आहे.