- शीलेश शर्मा । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली/सहारणपूर : काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांना सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी हिंसाचारग्रस्त सहारनपूरमध्ये येण्यास जिल्हा प्रशासनाने मज्जाव केला आणि त्यामुळे सहारनपूरच्या हद्दीपाशीच त्यांनी दंगलग्रस्त दलितांची भेट घेऊ न, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत जिल्हाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना सहारनपूरमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली.मात्र आपण पुन्हा सहारनपूरला जाणार असल्याचे खा. गांधी यांनी नंतर जाहीर केले. सहारनपूरच्या हद्दीवरील जाहजहांपूर चौकीपाशी दलित कुटुंबांची भेट घेतल्यानंतर, आज देशात गरीब आणि कमजोर घटकांना कोणतेच स्थान राहिलेले नाही. दलितांवर अत्याचार होत आहेत, त्यांना दाबून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. हे केवळ उत्तर प्रदेशात नव्हे, तर साऱ्या देशात होत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. सहारनपूरच्या हद्दीपाशी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी व राहुल गांधी यांच्यात काहीशी वादावादीही झाली. त्या भागात १४४ कलम लागू केले असतानाही, तिथे त्यांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक जमले होते. त्यांच्यासोबत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद व खा. राज बब्बर हेही होते. राज बब्बर म्हणाले की, उत्तर प्रदेशात दलितांवर होणारे अत्याचार सहन केले जाणार नाही. या प्रश्नावर काँग्रेस देशव्यापी आंदोलन उभारेल. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात राहुल गांधी पुन्हा सहारनपूरला जाणार आहेत. दिल्लीत परत आल्यावर त्यांनी ट्विट केले असून, उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असून, त्यास राज्य सरकार जबाबदार आहे, अशी टीका त्यात केली आहे. देशातील गरीब, दलित वर्ग घाबरलेला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. याआधी बसपाच्या प्रमुख मायावती आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनाही सहारनपूरमध्ये प्रवेशास बंदी घालण्यात आली होती.- सहारनपूरमध्ये ठाकुरांनी दलितांवर अत्याचार करूनही राज्य सरकारने कोणतीही कारवाई न केल्याच्या निषेध करण्यासाठी काँग्रेस, सपा आणि बसपा एकत्र मिळून राज्यात आंदोलन करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गरीब, दलितांवरील अत्याचारात वाढ
By admin | Published: May 28, 2017 4:20 AM