राज्यात आरक्षणचा मुद्दा ऐरणीवर आला असताना देशातील ५ राज्यांत होत असलेल्या निवडणुकांमध्येही आरक्षण आणि जातनिहाय जनगणना हा प्रमुख मुद्दा ठरत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आपल्या प्रचार सभांतून आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करत आहेत. तसेच, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नागरिकांसाठी गॅरंटी म्हणून अनेक योजनांची घोषणाही केली जात आहे. राहुल गांधींनी तेलंगणातील प्रचार सभेत बोलताना आज पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. तसेच, ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण वाढविण्याची घोषणाच त्यांनी केली. तत्पूर्वी त्यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही एका प्रचारसभेत बोलून दाखवला होता.
छत्तीसगडमधील बेमेतरा येथील प्रचारसभेत बोलताना राहुल गांधींनी जातनिहाय जनगणना आणि त्याचे फायदे सांगितले होते. जातनिहाय जणगणनेचा निर्णय ऐतिहासिक असेल. त्यामुळे संपूर्ण देशाचे चित्र बदलून जाईल. यामुळे देशातील ओबीसी आणि गरिबांना त्यांच्या खऱ्या लोकसंख्येविषयी माहिती मिळेल. त्यांना त्यांची शक्ती कळेल. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा हा सर्वांत क्रांतिकारी निर्णय असेल, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेचे जोरदार समर्थन केले होते. आता, तेलंगणातील प्रचारसभेत त्यांनी ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण वाढवून देण्याची घोषणा केली आहे.
राहुल गांधींनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यावर जोरदार टीका केली. केसीआर यांनी जेवढा पैसा चोरी केलाय, तोच पैसा आम्ही गरिबांच्या हितासाठी वापरणार, असे राहुल यांनी म्हटले. यावेळी, राज्यात काँग्रेसचं सरकार आल्यास महिलांना दरमहा २५०० रुपये आणि कॉलेज विद्यार्थ्यांना ५ लाख रुपये देण्याची घोषणा केली. तसेच, घर बांधण्यासाठीही ५ लाख रुपये देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. शेतकऱ्यांना १५ हजार वार्षिक, २०० युनिट वीज मोफत आणि ४ हजार मासिक पेन्शन देण्याचीही घोषणा केली. यावेळी, आरक्षणावरही भाष्य केलं.
काँग्रेसची सत्ता आल्यास जातनिहाय जनगणना
छत्तीसगडमध्ये राहुल गांधी असेही म्हणाले होते की, नरेंद्र मोदी हे जातनिहाय जनगणना करतील किंवा करणार नाहीत; परंतु, छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता पुन्हा आल्यास सर्वप्रथम जातनिहाय जनगणनेच्या निर्णयावर सही केली जाईल. यातूनच गरिबांना त्यांची ताकद समजणार आहे. तुमच्यासोबत राहून तुमच्यासाठी काँग्रेस पक्ष हा निर्णय घेणार आहे. आता कोणतीही शक्ती आम्हाला यापासून अडवू शकणार नाही.