मुंबई : ५०० आणि एक हजार रुपयांच्या रद्द केलेल्या नोटा जमा करून घेणे आणि त्या बदल्यात जुन्या व पर्यायी नोटा देणे हे सरकारने अचानकपणे टाकलेले काम ही आपली सामाजिक जबाबदारी आहे, या भावनेतून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या देशभरातील बँक कर्मचाऱ्यांची अवस्था वेठबिगारासारखी झाली आहे. सरकारने या कष्टांची जाण ठेवून बँक कर्मचाऱ्यांना अंतरिम पगारवाढ द्यावी, अशी मागणी ‘इंटक’शी संलग्न इंडियन नॅशनल बँक एप्लॉईज फेडरेशनने केली आहे.फेडरेशनचे सरचिटणीस सुभाष सावंत यांनी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहून आधीच कामाच्या बोजाने त्रस्त असलेल्या बँक कर्मचाऱ्यांच्या सध्या झालेल्या शोचनीय अवस्थेकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. ज्यांच्या भरवशावर सरकारने हा धाडसी निर्णय घेतला व ज्यांना त्यासाठी घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे राबविले जात आहे, ते बँक कर्मचारी विमा कंपन्यांसह अन्य सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत आजही पगाराच्या दृष्टीने खालच्या पातळीवर आहेत. जेटली यांनी आता तरी यात लक्ष घालून, या परीक्षेच्या घडीला केलेल्या कष्टांची जाणीव ठेवावी आणि बँक कर्मचाऱ्यांना अंतरिम पगारवाढ मिळेल व आगामी वेतनकरार सन्मानजनक होईल, असे पाहावे.फेडरेशन म्हणते की, बहुतांश बँकांमध्ये कर्मचाऱ्यांची चणचण आहे. रिझर्व्ह बँकेने पुरेशी पूर्वतयारी न करता, एवढे मोठे काम पुरेशी पूर्वतयारी न करता अंगावर घेतले, असे गेल्या पाच दिवसांचा अनुभव पाहता असे म्हणावेसे वाटते. अशा परिस्थितीत बँकांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नानाविध प्रकारच्या गैरसोर्ई सोसून नाईलाजाने रात्री उशिरापर्यंत राबावे लागत आहे. यात विशेषत: महिला कर्मचाऱ्यांचे खूप हाल होत आहेत. (विशेष प्रतिनिधी)
कष्ट जाणूून बँक कर्मचाऱ्यांचे पगार वाढवा
By admin | Published: November 16, 2016 1:12 AM