नवी दिल्ली : एच-१बी व्हिसाचे नियम अधिक कठोर करण्याची प्रक्रिया अपेक्षेपेक्षा जास्त वेळ घेऊ शकते, असे संकेत व्हाइट हाउसचे प्रेस सचिव सीन स्पाइसर यांनी दिले. या पार्श्वभूमीवर भारतीय कंपन्यांना व्हिसा मिळविण्यासाठी आणखी एक वर्ष मिळण्याची शक्यता आहे.डोनाल्ड ट्रम्प प्रशासन व्हिसा धोरणाकडे सर्वंकश दृष्टीने पाहत आहे, असे स्पाइसर यांनी सांगितले. तथापि, त्यासाठी किती वेळ लागेल, याचा खुलासा त्यांनी केला नाही. भारताचे विदेश आणि वाणिज्यमंत्री अमेरिका दौरा करून आल्यानंतर ट्रम्प प्रशासनाकडून हे वक्तव्य आले आहे. स्पाइसर यांनी सांगितले की, आमच्या सीमांच्या सुरक्षेचा मुद्दा तसेच आमचा देश आणि आमचे लोक यांची सुरक्षा नजरेसमोर ठेवून राष्ट्राध्यक्षांनी धोरणाबाबत आदेश काढला होता. एच-१बी व्हिसा, वैवाहिक जोडीदार व्हिसा अथवा विद्यार्थी व्हिसासंबंधीची धोरणेही याच बाबींना नजरेसमोर ठेवून ठरविली जात आहेत. ट्रम्प प्रशासनाच्या नव्या मसुद्याुनसार एच-१बी व्हिसावर अमेरिकेत येणाऱ्या विदेशी कर्मचाऱ्यांना किमान १ लाख डॉलर वार्षिक वेतन द्यावे लागेल. अमेरिकी नागरिकांना मिळणाऱ्या सध्याच्या वेतनाच्या बरोबरीचे हे वेतन आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)
एच-१बी व्हिसासाठीची वेळ वाढविली
By admin | Published: March 18, 2017 2:18 AM