नवी दिल्ली : देशामध्ये गुरुवारी कोरोनाचे ९५,७३५ नवे रुग्ण आढळले असून, एका दिवसातील रुग्णसंख्येचा हा उच्चांक आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४४ लाखांवर पोहोचली. या आजारामुळे आणखी १,१७२ जण मरण पावल्याने बळींची एकूण संख्या ७५,०६२ झाली आहे.
कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४४,६५,८६३ झाली असून, या आजारातून बरे होणाऱ्यांचा आकडा ३४,७१,७८३ झाला आहे, तर रुग्णांचा मृत्यूदर १.६९ टक्का इतका राखण्यात यश आले आहे. सध्या देशात ९,१९,०१८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून, हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या २०.५८ टक्के इतके आहे, तर बरे होणाऱ्यांचे प्रमाण ७७.७४ टक्क्यांवर पोहोचले आहे. देशामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येने ७ ऑगस्ट रोजी २० लाखांचा टप्पा ओलांडला. त्यानंतर २३ ऑगस्टला ३० लाख व ५ सप्टेंबरला ४० लाखांचा टप्पा कोरोना रुग्णसंख्येने गाठला.
कोरोना बळींची संख्या तामिळनाडूमध्ये ८,०९०, कर्नाटकमध्ये ६,८०८, दिल्लीत ४,६३८, आंध्र प्रदेशात ४,६३४, उत्तर प्रदेशमध्ये ४,११२, पश्चिम बंगालमध्ये ३,७३०, गुजरातमध्ये ३,१४९, पंजाबमध्ये २,०६१, मध्यप्रदेशमध्ये १,६४०, राजस्थानमध्ये १,१७८ व तेलंगणामध्ये ९२७ इतकी आहे. बळी गेलेल्यांपैकी ७० टक्के लोक हे एकाहून अधिक व्याधींनी ग्रस्त होते.
कोरोना चाचण्यांची संख्या ५ कोटी २९ लाखांवर
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या म्हणण्यानुसार, ५ सप्टेंबर रोजी देशामध्ये ११,२९,७५६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे कोरोना चाचण्यांची एकूण संख्या आता ५,२९,३४,४३३ इतकी झाली आहे. देशात रोज १० लाख चाचण्या करण्याचे लक्ष्य केंद्र व राज्य सरकारांनी राखले होते. मात्र, आता त्याहून जास्त कोरोना चाचण्या होत आहेत. चाचण्यांच्या वाढलेल्या प्रमाणामुळे रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढले आहे.
वर्षाअखेर लस उपलब्ध होईलच, कंपनीचा दावा
अॅस्ट्राझेनेका फार्मास्युटिकल्स व ऑक्सफर्ड यांनी तयार केलेल्या लसीच्या चाचण्या ब्रिटनमध्ये थांबविण्यात आल्या असल्या तरी ही लस यावर्षीच्या अखेरीस सर्वांसाठी उपलब्ध होईल, असा दावा त्या कंपनीचे सीईओ पास्कल सॉरिओट यांनी केला आहे. एका व्यक्तीवर त्या लसीचे दुष्परिणाम दिसून आल्याने ब्रिटनमध्ये तिच्या मानवी चाचण्या थांबविण्यात आल्या आहेत. या प्रकल्पात भारतातील सिरम इन्स्टिट्यूटही सहभागी आहे. त्यामुळे सिरमलाही भारतात त्या लसीच्या मानवी चाचण्या थांबवाव्या लागल्या आहेत.