पाटणा : ‘बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे वय झाले आहे, विश्वास नसलेल्या लोकांच्या गराड्यात सापडल्याने ते राजकीयदृष्ट्या एकाकी पडल्यासारखे वाटू लागले आहेत, अशी टीका निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी रविवारी केली.
प्रशांत किशोर भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप ७१ वर्षीय नितीशकुमार यांनी नुकताच केला होता. त्याला उत्तर देताना प्रशांत किशोर यांनी जदयू काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा सल्ला दिला आहे. ‘हळूहळू, नितीशकुमार यांचे वय वाढत असल्याचे दिसते, त्यांचा आता चांगलाच भ्रमनिरास झाला आहे,’ असा टोलाही त्यांनी लगावला. प्रशांत किशोर यांनी यापूर्वी बिहारच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्यावसायिक आणि पक्ष सहकारी म्हणून काम केले आहे.
‘नितीशकुमार एक गोष्ट बोलू लागतात आणि काहीतरी वेगळेच बोलून विषय संपतो. मी भाजपसाठी काम करतोय असे जर त्यांना वाटत असेल, तर मी काँग्रेसला बळकट करणाऱ्या गोष्टी का सुचवतोय?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ४५ वर्षीय प्रशांत किशोर सध्या बिहारच्या ३,५०० किमी पदयात्रेद्वारे राज्य पिंजून काढत आहेत.