नवी दिल्ली : म्हैस व जर्सी गायीच्या दुधाच्या सेवनामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये वाढ होत असल्याचे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक शंकरलाल यांनी केले आहे. देशी गायीचे दूध प्यायल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती कमी होते, असा दावाही त्यांनी केला आहे.ते म्हणाले की भारतीय म्हणजे देशी गायींच्या दुधामुळे सात्विक ताकद मिळते. या देशी गायींच्या पोटात कोणत्याही मार्गाने चुकून विष गेले तरी ते गोमूत्र, दूध वा शेणामध्ये मिसळत नाही. त्यामुळे देशी गायीचेच दूध सात्विक असते. याउलट जर्सी गायीचे वा म्हशीचे दुध प्यायल्याने व्यक्ती लवकर संतापते, चिडते आणि तिची सहनशीलताही संपते, असेही शंकरलाल म्हणाले. बायबल, कुराण यासह सर्व धर्मग्रंथांनी गोमांस निषिद्ध मानले आहे, असेही ते म्हणाले.देशी गायींद्वारे गुन्हेगारमुक्त भारत ही संकल्पना देशात प्रत्यक्षात आणायला हवी, अशे सांगून, ते म्हणाले की प्रदूषण करी करण्यातही देशी गाय मोठी भूमिका बजावते. घरात एक ग्रॅम तुपाचा दिवा लावल्यास १00 किलो प्राणवायू निर्माण होतो आणि तुळशीसमोर तुपाचा दिवा लावला की ओझोनही निर्मिती होते. घरात कोणी आजारी असेल, तर त्याच्यासमोर तुपाचा दिवा अवश्य लावावा. त्यामुळे आजारी व्यक्तीला पुरेसा प्राणवायू मिळतो आणि तो लवकर बरा होतो, असे दावेही शंकरलाल यांनी केले आहेत.>वादग्रस्त वक्तव्यांचा सपाटारेडिएशनचा त्रास होऊ नये, यासाठी फोनला शेण व गोमूत्र एकत्र करून लावतो, असेही शंकरलाल यांनी यापूर्वी सांगितले होते. एवढेच नव्हे, तर गरोदर महिलेने शेण व गोमूत्र प्राशन केल्यास तिचे बाळंतपण व्यवस्थित व कोणत्याही शस्त्रक्रियेीशवाय होते, असाही दावा त्यांनी केला होता. रा. स्व. संघातर्फे ३१ मार्च रोजी गौजप महायज्ञचे आयोजन करण्यात येणार आहे.
जर्सी गाय व म्हशीच्या दुधामुळे वाढते गुन्हेगारी प्रवृत्ती, संघाच्या नेत्याचे वक्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 4:18 AM