नरेंद्र मोदींच्या व्हिडिओला वाढते डिसलाईक्स भाजपासाठी काळजीचे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 12:47 AM2020-09-08T00:47:16+5:302020-09-08T06:59:52+5:30
आजकाल सोशल मीडियात मोदी यांच्या व्हिडिओवर डिसलाइक्स दिसत आहेत.
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवर निवडणुका जिंकणाऱ्या भाजपसाठी मोदी यांना नापसंत (डिसलाईक्स) करणाऱ्यांची वाढती संख्या काळजीची ठरली आहे.
आजकाल सोशल मीडियात मोदी यांच्या व्हिडिओवर डिसलाइक्स दिसत आहेत. भाजपमध्ये यावर उत्तर शोधले जात आहे. मोदी यांच्या व्हिडिओला डिसलाइक करण्याचा क्रम सोमवारीही थांबलेला नव्हता. सोमवारी मोदी यांनी शिक्षण धोरणावर राज्यांच्या राज्यपालांशी ऑनलाईन चर्चा केली. भाजपने ३१.५ लाख सब्सक्राइबरवाल्या यूट्यूबवर प्रसारीत केली. मोदी यांच्या व्हिडिओला डिसलाइक्सची संख्या लाइक्सच्या तुलनेत सातपट जास्त होती.
अमित मालवीय यांची काँग्रेसवर टीका
मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या व्हिडिओला डिस्लाइक्सची संख्या अचानक वाढली तेव्हा व्हिडिओवरील डिसलाइकचे प्रकरण बातम्यांत आले. भाजपच्या आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय यांनी काँग्रेसवर याचे खापर फोडले.
ते म्हणाले, काँग्रेसला वाटते की, बोट्सच्या (स्वचालित) माध्यमातून डिस्लाइक करून मोदी यांची विश्वसनीयता कमी करू शकतो. पण फक्त दोन टक्के डिस्लाइक्सच भारतातून केले गेले. राहिलेले ९८ टक्के विदेशांतील होते. यासाठी राहुल गांधींच्या आवडत्या टर्किश बोट्सचा वापर झाला.