नवी दिल्ली : राज्यसभेच्या ५७ जागांसाठी झालेल्या द्विवार्षिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआ) विरोधक संयुक्त पुरोगामी आघाडीवर (संपुआ) बढत प्राप्त झाली असली तरीही महत्त्वाची विधेयके मंजूर करवून घेण्यासाठी आवश्यक असलेले बहुमत तिच्याकडे नाही. यासाठी रालोआला प्रादेशिक पक्षांवर अवलंबून राहावे लागेल.वरिष्ठ सभागृहात प्रादेशिक पक्षांचे ८९ सदस्य झाले आहेत. निवडणुकीनंतर त्यांच्या संख्येत कुठलाही बदल झालेला नाही. चार जागांच्या फायद्यासह समाजवादी पार्टी आता १९ सदस्यांवर पोहोचली आहे, तर संयुक्त जनता दल (जदयू) आणि राष्ट्रीय जनता दलाची (राजद) एकूण सदस्य संख्या १२ झाली आहे. याशिवाय तृणमूल काँग्रेस आणि अण्णा द्रमुकचे प्रत्येकी १२ सदस्य आहेत. तसेच बसपाचे सहा, माकपाचे आठ, बीजदचे सात आणि द्रमुकचे पाच सदस्य आहेत. निवडणुकीनंतर २४५ सदस्यीय राज्यसभेत रालोआची सदस्यसंख्या पाचने वाढून ७४ झाली आहे तर काँग्रेसप्रणीत संपुआचे तीन सदस्य कमी झाले असून एकूण ७१ सदस्य आहेत. ३ जूनला वरिष्ठ सभागृहात ३० उमेदवार अविरोध निवडून आले. रालोआने आपल्या एकूण सदस्यांमध्ये आणखी ११ सदस्यांची भर घातली असून त्यात भाजपाच्या खात्यात सात, तेदेपा दोन तसेच शिवसेना आणि शिरोमणी अकाली दलाचा प्रत्येकी एक सदस्य आहे. उत्तर प्रदेशातील ११ जागांपैकी सात सपाच्या खात्यात गेल्या तर बसपाने दोन, भाजपा व काँग्रेसने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविला. (लोकमत न्यूज नेटवर्क)>संपुआचे पाच सदस्य बिनविरोधसंपुआच्या फक्त पाच सदस्यांची अविरोध निवड झाली असून, यामध्ये काँग्रेसचे चार तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सदस्य आहे. इतर पक्षांमध्ये जदयू दोन, राजद दोन, अण्णा द्रमुक चार, द्रमुक दोन आणि बीजदचे तीन सदस्य अविरोध राज्यसभेवर पोहोचले आहेत. शनिवारी २७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाला १२ जागा मिळाल्या. पक्षाचे हरियाणात दोन, उत्तर प्रदेशात एक, मध्य प्रदेशात दोन, राजस्थानात चार, कर्नाटकात एक आणि झारखंडमध्ये दोन उमेदवार निवडून आले आहेत. दुसरीकडे काँग्रेसला सहा जागा मिळाल्या असून, त्यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एक आणि कर्नाटकातील तीन जागांचा समावेश आहे.
राज्यसभेत बढत पण बहुमतापासून दूरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2016 6:24 AM