लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपतींच्या अभिभाषणात आणीबाणीचा उल्लेख केला तेव्हा सत्ताधारी पक्षाने काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर निशाणा साधला, तर मुर्मू यांनी आपल्या भाषणात तरुण आणि ईशान्येचा उल्लेख केला, तेव्हा विरोधी सदस्यांनी ‘नीट’ परीक्षेतील कथित हेराफेरी आणि मणिपूरसारख्या मुद्द्यांवर सरकारला फटकारले. सुमारे ५५ मिनिटांच्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणात सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी तब्बल १८० वेळा बाकडे वाजवले, तर विरोधी सदस्यांनीही प्रत्युत्तराची एकही संधी सोडली नाही.
राष्ट्रपतींनी आणीबाणीचा उल्लेख केल्यावर सत्ताधारी पक्षाने सर्वाधिक काळ बाकडे वाजवली. यावेळी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी ‘शेम’ ‘शेम’च्या घोषणा दिल्या. त्यावेळी विरोधी सदस्य आपापल्या जागेवर शांतपणे बसले. मात्र, काही सदस्य आज अघोषित आणीबाणी आहे, असे म्हणताना ऐकू आले.
आपचा अभिभाषणावर बहिष्कार आम आदमी पक्षाच्या (आप) संसद सदस्यांनी त्यांच्या पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ गुरुवारी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला तसेच संसद परिसरात आंदोलनही केले.
संसदेत विरोधकांडून दररोज ‘नीट’च्या घोषणाविरोधकांनी ‘नीट’ परीक्षेत कथित अनियमिततेचा आरोप केला. ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारन यांच्यासह द्रमुकचे अनेक सदस्य मोठ्याने ‘नीट-नीट’ म्हणताना ऐकू आले, तर सपा, एनडीए आणि काँग्रेसचे काही सदस्य ‘अग्निपथ’ योजनेचा उल्लेख करताना दिसले.
संसदेत ‘जय संविधान’ म्हणता येत नाही का? देशाच्या संसदेत ‘जय संविधान’ म्हणता येत नाही का? संसदेत असंसदीय आणि असंवैधानिक घोषणा देण्यापासून सत्ताधारी पक्षाच्या लोकांना रोखण्यात आले नाही; परंतु विरोधी खासदाराने ‘जय संविधान’ म्हटल्यावर आक्षेप घेण्यात आला. निवडणुकीच्या वेळी समोर आलेला राज्यघटना विरोधीवाद आता नव्या स्वरूपात समोर येत आहे. - प्रियांका गांधी, काँग्रेस नेत्या.