भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना म्हटलं की, दोन्ही संघांवर अत्यंत दबाव असतो. दोन्ही संघातील खेळाडूंना अपेक्षांचं ओझं घेऊनच खेळावं लागत. कारण, दोन्ही देशाताली नागरिकांना विजय हवाच असतो. भारत-पाकिस्तान या दोन्ही देशामधील तणावाचे संबंध यास कारणीभूत असतात. त्यातच, भारतीय क्रिकेट संघाला वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच पाकिस्तान विरोधात पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे, भारतीय चाहते नाराज झाले असून काहींनी मोहम्मद शमीला ट्रोल करण्या सुरुवात केलीय. मात्र, आता काँग्रेस नेते राहुल गांधीच शमीच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.
पाकिस्ताननं दुबईच्या स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात भारताचा १० विकेट्सनं पराभव केला. सामन्यात भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी सपशेल फोल ठरली. भारतीय संघाच्या मानहानीकारक पराभवावर सोशल मीडियात टीम इंडियाविरोधात ट्रोलर्स चांगलेच सक्रीय झाले असून गोलंदाजांना लक्ष्य केलं जात आहे. मुख्यत्वे मोहम्मद शमीला ट्रोल केलं जात आहे. त्याविरोधात आक्षेपार्ह शब्दात टिप्पणी केली जात आहे. ट्रोलर्सच्या या भाषेवर अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून ते शमीच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. विशेष म्हणजे राहुल गांधींनीही शमीचा पाठबळ देण्याचं काम केलंय.‘मोहम्मद शमी आम्ही तुझ्यासोबत आहोत. लोकांची मने घृणेने भरलेली असतात कारण त्यांना कोणी प्रेम दिलेलंच नसतं. त्यांना माफ करुन टाक.’, असे ट्विट राहुल गांधींनी केलंय.
शमीच्या समर्थनार्थ आले क्रिकेटर्स
समालोचक हर्षा भोगले यांनीही शमीवर टीका करणाऱ्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. "जे लोक शमीबाबत वाईट बोलत आहेत. त्यांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही क्रिकेट पाहणं सोडून द्या. तुमची कमतरता कधीच जाणवणार नाही", असं रोखठोक विधान हर्षा भोगले यांनी केलं आहे. भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण, सलामीवीर वीरेंद्र सेहवाग, फिरकीपटू युजवेंद्र चहल यांनीही ट्रोलर्सला खणखणीत प्रत्युत्तर दिलं आहे. "मीही त्याच भारत-पाकिस्तान सामन्याचा एक भाग आहे की जिथं भारताला पराभवला सामोरं जावं लागलं होतं. हे मी काही वर्षांपूर्वीचं वातावरण सांगू इच्छितो. त्यावेळी मला कुणीच असं पाकिस्तानात निघून जा वगैरे बोललं नव्हतं. सध्या जो मुर्खपणा सुरू आहे तो लगेच थांबवायला हवा", असं इरफान पठाण म्हणाला.