ऑनलाइन लोकमत
सूरत, दि. १९ - पाटीदार समाजासाठी आरक्षणाची मागणी करणा-या हार्दिक पटेलविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्हिडीओमध्ये हार्दिक पोलिसांना ठार मारण्याचे वक्तव्य करताना दिसत असून याप्रकरणी त्याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणीही राजकोट पोलिसांनी हार्दिकवर गुन्हा दाखल केला आहे.
रविवारी संध्याकाळी हार्दिकला ताब्यात घेण्यात घेण्यासाठी पोलिस त्याचा पाठलाग करत असताना हार्दिकने तिरंगा पायदळी तुडवला आणि तो मीडियाशी बोलण्यासाठी पुढे सरसावला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना उधळून लावण्याचा हार्दिक पटेलचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला. आंदोलनासाठी निघालेल्या हार्दिकला राजकोट - जामनगर महामार्गावरुन पोलिसांनी ताब्यात घेतले. पटेल समाजाच्या लोकांना सामन्याची तिकीटे दिली नाहीत असा आरोप करत पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेलने राजकोट येथे होणारा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना उधळून लावण्याची धमकी दिली होती. रविवारी सकाळी आंदोलनापूर्वी पोलिसांनी हार्दिकला ताब्यात घेतले.