नवी दिल्ली - देशभरात स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरू झाली असून राज्य आणि देशातील प्रशासकीय यंत्रणाही कामाला लागल्या आहेत. शाळा, महाविद्यालये, कार्यालये आणि संस्थांमध्ये ध्वजारोहनाची तयारी सुरू झाली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत १५ ऑगस्ट दिनाच्या कार्यक्रमाची रेलचेल पाहायला मिळत आहे. यंदा देशाचा ७६ वा स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. मात्र, दिल्लीच्या लाल किल्ल्यावर मोठी सजावट होणार नाही. दरवर्षी लाल किल्ल्यावर मोठी तयारी केली जाते. मात्र, यंदा लाल किल्ला आपल्या मूळ स्वरुपातच पाहायला मिळणार आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुरक्षा यंत्रणा नेहमीप्रमाणेच अलर्ट झाली आहे. तर, दिल्लीच्या राजपथावरही मोठी सुरक्षा तैनात असणआर आहे. मात्र, यंदा मोठी सजावट होत असून काही वेगळंच आकर्षण असणार आहे. लाल किल्ल्याच्या प्राचीरसमोर जी-२० चा फुलांना सजवलेला लोगो असणार आहे. तर, प्रत्येक राज्यातील ७५ दाम्पत्य पारंपरिक वेशभूषेसह लाल किल्ल्याजवळ उपस्थित असणार आहेत. यंदा प्रमुख पाहुणे म्हणून ६२२ वायब्रेंट गावचे सरपंच उपस्थित असणार आहेत. तसेच, कामगारही विशेष अतिथी म्हणून हजर असणार आहेत. सेंट्रल विस्टा बिल्डींग बनवण्यासाठी ज्यांनी काम केलं, ते कामगार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. त्यांसह, प्राथमिक शाळांचे शिक्षक, नर्स, मच्छीमार, बॉर्डरवरील श्रमिक, घर जल योजनेतील श्रमिकही विशेष पाहुणे म्हणून स्वातंत्र्य दिनी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ७.३० वाजता तिरंगा ध्वजवंदन करतील. त्यानंतर, ते देशाला संबोधित करणार आहेत. मोदींच्या भाषणानंतर लाल किल्ल्यावरील तिरंगा झेंड्यावर पुष्पवर्षाव होणार आहे.
चोख सुरक्षा यंत्रणा
लाल किल्ला व राजपथ परिसरात दिल्ली पोलिसांचे १० हजार जवान तैनात असणार आहेत. तर, १ हजार सीसीटीव्ही कॅमेरही लावण्यात आले आहेत. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून येणाऱ्या-जाणाऱ्यांवर नजर असणार आहे. तसेच, एआय कॅमेरा, एफआरएस कॅमेरा, १ हजारपेक्षा अधिक रुफ टॉपवर अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह तैनात जवान, लाल किल्ल्याजवळ एंट्री झोन, अँन्टी एअरक्राफ्ट आणि अँन्टी स्किनींग सिस्टीमही असणार आहे.