Independence Day 2024: आज संपूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून सलग ११ व्यांदा तिरंगा ध्वज फडकवला. यावेळी, देशवासीयांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाशी संबंधित विविध मुद्द्यांवर भाष्य केले. याशिवाय, बांगलादेशात सुरू असलेला हिंसाचार आणि हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांसंदर्भातही त्यांनी भाष्य केले. "बांगलादेशातील हिंदूंची सुरक्षितता सुनिश्चित व्हायला हवी. भारताला शेजारील देशांमध्ये शांतता हवी आहे. बांगलादेशमध्ये जे घडले ते अतिशय चिंताजनक आहे," असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटेल आहे.
मोदी म्हणाले, "मला आशा आहे की तेथील परिस्थिती लवकरात लवकर सामान्य होईल. अंतरिम सरकार तेथील हिंदू आणि अल्पसंख्यक समाजाची सुरक्षितता सुनिश्चित करेल. तसेच, आगामी काळातही बांगलादेशच्या विकासाच्या प्रवासासाठी आमच्या शुभेच्छा कायम राहतील," असेही मोदी म्हणाले.
'शेजारील देश म्हणून काळजी वाटणे स्वाभाविक' -मोदी म्हणाले, "बांगलादेशात जे काही घडले त्यासंदर्भात एक शेजारी देश म्हणून काळजी वाटणे साहजिक आहे. मला आशा आहे की तेथील परिस्थिती लवकर सामान्य होईल. तेथील अल्पसंख्याक हिंदू समाजाची सुरक्षितता सुनिश्चित व्हावी, अशी देशवासीयांची इच्छा आहे. आपल्या शेजारी देशांनी सुख-शांतीचा मार्ग अवलंबावा, अशी भारताची इच्छा असते. शांततेसाठी आमची बांधिलकी आहे. येणाऱ्या काळातही बांगलादेशचा विकासाच्या प्रवास आपल्या शुभेच्छाच राहतील, कारण आपण मानवजातीच्या कल्याणाचा विचार करणारे लोक आहोत.
हिंदूंवर सातत्याने होतायत हल्ले -गेल्या 5 ऑगस्टला वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि आपला देश सोडून त्या भारतात आल्या. यानंतर, बांगलादेश राजकीय अस्थिरतेतून जात आहे. मंगळवारी (13 ऑगस्ट 2024) अल्पसंख्यक हिंदू आणि बांगलादेशी सैनिकांमध्ये चकमक उडाली होती. हे हिंदू लोक देशातील हिंसाचारात बेपत्ता झालेल्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या पोस्टर्ससह निषेध करत होते. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस राहत असलेल्या ढाका येथील जमुना स्टेट गेस्ट हाऊसबाहेर हे सर्व हिंदू निदर्शन करत होते.