नवी दिल्ली- स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या हर घर तिरंगा अभियानामुळे आत्मनिर्भर भारत उपक्रमाला प्रोत्साहन दिले आहे. यावेळी हर घर तिरंगा अभियानामुळे देशभरात 30 कोटींहून अधिक राष्ट्रध्वजांची विक्री झाली असून, तिरंग्याबाबत व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजापेक्षा जास्त आहे. त्यामुळे जवळपास 500 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे म्हणणे आहे की देशभक्ती आणि स्वयंरोजगाराच्या या अभियानामुळे देशभरातील लोकांमध्ये देशभक्तीची एक अद्भुत भावना आणि को-ऑपरेटिव्ह व्यवसायाची शक्यता निर्माण झाली आहे.
कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 15 दिवसांत मोठ्या संख्येने व्यापारी संघटनांनी CAT च्या झेंड्याखाली देशभरात 3000 हून अधिक तिरंगा कार्यक्रम आयोजित केले ज्यामध्ये मोठ्या संख्येने लोकांनी स्वइच्छेने भाग घेतला. व्यापाऱ्यांसह विविध क्षेत्रातील लोकांनी पुढे जाऊन तिरंग्याची शान कायम ठेवली. हर घर तिरंगा अभियानाने भारतीय उद्योजकांची क्षमताही दाखवून दिली आहे. ज्यांनी देशातील जनतेची तिरंग्याची अभूतपूर्व मागणी पूर्ण करण्यासाठी सुमारे 20 दिवसांच्या विक्रमी वेळेत 30 कोटींहून अधिक तिरंग्यांची निर्मिती केली.
CAT च्या आवाहनावर, देशभरातील व्यापारी संघटनांनी सर्व राज्यांमध्ये रॅली, मिरवणुका, तिरंगा गौरव यात्रा, सार्वजनिक सभा आणि परिषदांसह तिरंगा कार्यक्रम आयोजित करून देशभक्तीची भावना जागृत केली. भरतिया आणि खंडेलवाल म्हणाले की, केंद्र सरकारने पॉलिस्टर आणि मशीनद्वारे बनवलेल्या ध्वजांना परवानगी देणार्या ध्वज संहितेत केलेल्या बदलांमुळेही देशभरात ध्वज सहज उपलब्ध होण्यास मोठा हातभार लागला आहे. पूर्वी भारतीय तिरंगा फक्त खादी किंवा कापडात बनवण्याची परवानगी होती. ध्वज संहितेतील या दुरुस्तीमुळे देशातील 10 लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळाला, ज्यांनी स्थानिक शिंपींच्या मदतीने त्यांच्या घरी किंवा छोट्या ठिकाणी तिरंगा ध्वज मोठ्या प्रमाणावर बनवला.
एसएमई उत्पादन आणि व्यापार क्षेत्राने अत्यंत संघटित पद्धतीने मोठ्या संख्येने भारतीय ध्वज तयार करण्यासाठी रात्रंदिवस काम केले. सामान्यतः बनवलेल्या ध्वजाच्या विविध आकारांमध्ये 6800×4200 mm, 3600×2400 mm, 1800×1200 mm, 1350×900 mm, 900×600 mm, 450×300 mm, 225×150 mm आणि 05h mm चा समावेश आहे. याआधी स्वातंत्र्य दिनानिमित्त, भारतीय तिरंग्याची वार्षिक विक्री सुमारे 150-200 कोटी रुपयांपर्यंत मर्यादित होती. तर हर घर तिरंगा अभियानामुळे विक्री अनेक पटींनी वाढून 500 कोटी रुपये झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.