नवी दिल्ली - देशात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. अमृत महोत्सव असल्याने केंद्र सरकारने 'हर घर तिरंगा' अभियान सुरू केलं. देशातील सर्वसामान्य जनतेपासून ते सेलिब्रिटी आणि उद्योगपतींपर्यंत सर्वच जण या अनोख्या अभियानामध्ये सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील प्रत्येक नागरिकाला देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन केलं होतं. यातच देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही साथ दिली आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा सोशल मीडियात चांगलेच सक्रिय असतात. समाजातील विविध घडामोडींची ते आवर्जुन दखल घेत असतात आणि त्यावर आपली भूमिका देखील स्पष्ट करत असतात. आनंद महिंद्राच्या ट्विट किंवा फेसबुक पोस्टचीही खूप चर्चा होत असते. आज पुन्हा एकदा आनंद महिंद्रा यांनी एक खास पोस्ट केली आहे. आनंद महिंद्रा यांनी 'हर घर तिरंगा' अभियानाला साथ देत एक खास फोटो ट्विट केला आहे. या फोटोची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.
आनंद महिंद्रांनी शेअर केला खास फोटो
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये एक वृद्ध महिला आणि तिचे पती हर घर तिरंगा मोहीमला समर्थन देत आपल्या घरावर तिरंगा लावताना दिसत आहेत. "स्वातंत्र्यदिनाचा एवढा गवगवा का केला जातोय असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर या दोघांना विचारा. कोणत्याही लेक्चरपेक्षा हे दोघं तुम्हाला चांगलं समजावून सांगतील. जय हिंद" असं आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
देशाची टपाल व्यवस्था 'देश की धडकन'
मुंबईच्या पोस्टमास्तर जनरल यांच्याकडून आनंद महिंद्रा यांना गिफ्ट म्हणून राष्ट्रध्वज प्राप्त झाला. मुंबई विभागाच्या पोस्टमास्तर जनरल स्वाती पांडे यांनी आनंद महिंद्रा यांची भेट घेऊन त्यांना राष्ट्रध्वज दिला. याबाबत पोस्ट विभागाचे आभार व्यक्त करताना आनंद महिंद्रा यांनी स्वाती पांडे यांच्यासोबत फोटो ट्विट केला होता. यात आनंद महिंद्रा यांनी देशातील पोस्ट विभागाचं कौतुक करताना टपाल व्यवस्था देशाची 'धडकन' असल्याचं म्हटलं होतं.