नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. लाल किल्ल्यावर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवव्यांदा ध्वजारोहण करण्यात आले आहे. ध्वजारोहण केल्यानंतर नरेंद्र मोदींनी संबोधनाला सुरुवात केली आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मी जगभरातील भारतप्रेमींना, भारतीयांना खूप खूप शुभेच्छा देतो, असं नरेंद्र मोदींनी सर्वप्रथम सांगितलं. तसेच केवळ भारताच्या कानाकोपऱ्यातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यात हा तिरंगा अभिमानाने फडकत असल्याचं नरेंद्र मोदी यांनी भाषणात म्हटलं आहे.
भारतीय जनतेतील सामूहिकतेची भावना पुन्हा एकदा जागृत झाली आहे. हर घर तिरंगाच्या माध्यमातून लोकांमध्ये चेतना निर्माण झाली. देशामध्ये किती सामर्थ्य आहे हे तिरंग्याच्या माध्यमातून जगाला समजले आहे. थाळी, टाळ्या वाजवून देशातील नागरिकांनी कोरोना योद्धांना पाठिंबा दिला. यातून चेतना निर्माण झाल्याचं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. तसेच भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला आहे. संपूर्ण जग आता भारताकडे गर्वाने, अपेक्षाने पाहतोय, असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.
नरेंद्र मोदींनी यावेळी एक नवा नारा दिला आहे.नरेंद्र मोदी यांनी 'जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान'ची घोषणा केली आहे. लाल बहादूर शास्त्रींनी 'जय जवान, जय किसान'चा नारा दिला. यानंतर अटल बिहारी वाजपेयींनी त्यात 'जय विज्ञान' जोडले. आणि आता त्यात 'जय अनुसंधान' जोडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे 'जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान', असा नवा नारा नरेंद्र मोदींनी यावेळी दिला.
दरम्यान, नरेंद्र मोदींनी पहिला संकल्प सांगितला इप्सित भारत घडवण्याचा. दुसरा संकल्प म्हणजे, गुलामीचा एकही अंश भारतातील कोणत्याही भागात नाही. तसेच यापुढेही तो राहता कामा नये. शेकडो वर्षातील गुलामीला नष्ट करायची आहे. तिसरा संकल्प म्हणजे आपल्याला आपल्या वारसा जपायचा आहे. आपल्या वारसावर आपल्याला गर्व असायला हवा. चौथा संकल्प एकतेचा आहे. पाचवा संकल्प हा नागरिकांच्या कर्तव्यांचा आहे. यामध्ये अगदी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून देशाता प्रत्येक नागरिक येतो, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. तसेच भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे. पुढील २५ वर्षे देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत, असे नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.
प्रत्येक भारतीयाला तिरंगा ध्वजामुळे प्रेरणा मिळाली
महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मरण करण्याची ही वेळ आहे. प्रत्येक भारतीयाला तिरंगा ध्वजामुळे प्रेरणा मिळाली. कोरोनाच्या काळात भारताने हार मानली नाही. स्वांतत्र्याच्या दीर्घ कालखंडानंतरही भारताने आपला प्रभाव कायम ठेवला. देशासमोर अन्नाच्या कमतरतेपासून ते कोरोनापर्यंत अनेक संकटे आली. देशाला मोठ्या युद्धांना सामोरे जावे लागले. मात्र, देशाने कधीही पराभव स्वीकारला नाही. देश सर्व संकटांना सामर्थ्याने आणि ताकदीने सामोरा गेला, असे पंतप्रधान म्हणाले.