Independence Day 2022, Owaisi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात ऐतिहासिक पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा झाला. देशातील सर्व नागरिकांना जात, धर्म, पंथ असा भेद विसरून 'भारतीय' या नावाखाली देशाचा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला. देशातच नव्हे तर परदेशातही काही ठिकाणी तिरंगा फडकावून किंवा विविध मोठ्या वास्तूंवर तिरंगी प्रतिकृती दाखवत भारताला सलाम करण्यात आला. या दरम्यान, देशातील स्वातंत्र्याबद्दल AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी एक मत व्यक्त केले. केवळ वृत्तपत्रात हेडलाईन यावी म्हणून नव्हे तर मी मनापासून हे बोलतोय, असेही ते म्हणाले.
"देश नक्कीच स्वतंत्र झाला आहे, पण जे स्वातंत्र्य गोरक्षकांना मिळाले आहे ते त्यांना देऊ नये", असे एक विधान हैदराबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ओवेसी यांनी केले. "देशात मुस्लीम सर्वात असुरक्षित आहेत. देशासाठी मुस्लीमांचे योगदान कोणापेक्षाही कमी नाही. त्यामुळे आपण एकत्र येऊन स्वातंत्र्य साजरे केले पाहिजे", अशी भूमिका ओवेसींनी मांडली.
भारतात सर्वाधिक उपेक्षा मुस्लीम समाजाची!
“माझ्या प्रिय मित्रांनो, स्वतंत्र भारताविषयी अभिमान बाळगा. मला मान्य आहे की आज देशातील परिस्थिती, अडचणी याची तुम्हाला कल्पना आहे आणि मलाही त्याची जाणीव आहे. पण तुम्हाला धीर धरावा लागेल. तुम्हाला हे ऐकायला अनेकांना कटू वाटेल, पण भारतात जर कोणाचा सर्वात जास्त अपमान झाला असेल तर तो मुस्लीम समाज आहे. भारतात, बहुतेक असुरक्षित लोक हे मुस्लीम आहेत. भारतात जर कोणाची सर्वाधिक उपेक्षा होत असेल तर ती मुस्लीम समाजाची आहे", अशा शब्दांत ओवेसींना आपले मत व्यक्त केले.
“मी हे टीव्हीच्या हेडलाईनसाठी म्हणत नाही. पण देश जरी स्वतंत्र झाला असला तरी जे स्वातंत्र्य गोरक्षकांना आहे, ते त्यांना मिळू नये. ज्यांची जीभ कोणत्याही समाजाविरुद्ध, कोणत्याही धर्माविरुद्ध खूप चालते. ते कोणाबद्दलही आक्षेपार्ह बोलतात. स्वातंत्र्याचा अर्थ असा नाही की गोरक्षकांना काहीही करण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. त्यामुळे त्यांना त्याप्रकारचे स्वातंत्र्य मिळू नये", अशी मागणी ओवेसी यांनी केली.